नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशभरात ६०,००० बालकांचा जन्म


नवी दिल्ली – नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशभरात जवळपास ६० हजार बालकांचा जन्म झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे भारत नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक बालकांचा जन्म होण्याच्या यादीमध्ये अव्वल राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. भारतामध्ये पहिल्याच दिवशी ६० हजार बालकांचा जन्म होईल, असे मुलांसंदर्भातील विषयांवर जगभरामध्ये काम करणाऱ्या युनिसेफ (युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंड) या संस्थेने म्हटले होते. त्याचबरोबर १ जानेवारी २०२१ रोजी जगभरामध्ये ३ लाख ७० हजार बालकांचा जन्म होईल, असेही युनिसेफने म्हटले होते. पण भारतात यंदा वर्षाच्या पहिल्याच दिवशी जन्माला येणाऱ्या बालकांचे प्रमाण हे मागील वर्षीपेक्षा कमी आहे. मागील वर्षी भारतात ६७ हजाराहून अधिक बालकांचा जन्म झाला होता.

सर्वाधिक बालकांचा जन्म कोणत्या देशांमध्ये नवीन वर्षाच्या आगमानाआधीच १ जानेवारी रोजी होईल यासंदर्भातील अंदाज व्यक्त करण्यात आला होता. भारतात त्यानुसार ५९ हजार ९९५ बालकांचा जन्म होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. त्याचबरोबर चीन ३५ हजार ६१५, नायझेरिया २१ हजार ४३९, पाकिस्तान १४ हजार १६१, इंडोनेशिया १२ हजार ३३६, इथियोपिया १२ हजार ६, अमेरिका १० हजार ३१२, इजिप्त नऊ हजार ४५५, बांगलादेश नऊ हजार २३६ आणि डेमोक्रेटीक रिपब्लिक ऑफ काँगो आठ हजार ६४० बालकांचा जन्म होईल, असे सांगण्यात आले होते. १ जानेवारीला जगभरामध्ये जन्माला येणाऱ्या बालकांपैकी ५२ टक्के बालके या दहा देशांमध्ये जन्माला येतील, असे युनिसेफने म्हटले आहे.

त्याचबरोबर युनिसेफने यंदाच्या वर्षी जन्माला येणाऱ्या १४ कोटी बालकांचे सरासरी वयोमान हे ८४ वर्ष असेल असेही म्हटले आहे. भारतामधील बालकांचे सरासरी वयोमान हे ८० वर्षे ९ महिने एवढे असेल असेही यात नमूद करण्यात आले आहे. २०२० मध्ये कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या संख्येपेक्षा ७८ पटींनी जास्त यंदाच्या वर्षी जन्माला येणाऱ्या बालकांची संख्या ही असणार आहे.