सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी दिली कोव्हिशिल्डच्या सुरक्षिततेची पूर्ण हमी


पुणे – ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) रविवारी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसींच्या आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली. या मोठ्या घोषणेनंतर संपूर्ण देशालाच एक मोठा दिलासा मिळाला. भारतात कोरोना प्रतिबंधक लसींच्या आपातकालीन वापरासाठी मान्यता मिळताच जागतिक स्तरावरून या निर्णयाचे स्वागत झाले. देशातही पंतप्रधानांसह अनेक नेतेमंडळींनीही या निर्णयाचे स्वागत केले. जागतिक आरोग्य संघटनेकडूनही कोरोनाशी लढण्यासाठी उचलण्यात आलेल्या या पावलाचे कौतुक झाले.

एकिकडे या कोरोना लसीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया येत असतानाच विरोधी पक्षांनी मात्र या लसीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे केले. कोरोना लसीला तिसऱ्या ट्प्प्यातील चाचण्यांच्या अहवालाविना मान्यता देण्यात आल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी याबाबत कोव्हिशिल्डच्या सुरक्षिततेची पूर्ण हमी दिली.

यासंदर्भातील वृत एबीपी न्यूजने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार अदर पुनावाल यांनी कोरोना लसीबाबतच्या बऱ्याच महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे दिली. कोव्हिशिल्ड लस नेमकी कितपत सुरक्षित आहे, या प्रश्नाला उत्तर देत त्यानी ही लस ऑक्सफर्डमधील काही निष्णांत शास्त्रज्ञांनी विकसित केल्याची बाब अधोरेखित केली. त्याचबरोबर लसीबाबतचा सर्व तपशील हा अनेक टप्प्यातील पडताळणीनंतरच हाती आल्याचेही ते म्हणाले. या लसीला युकेमध्येही मान्यता मिळाली असून, लसीच्या सुरक्षिततेबाबत आपल्या परिने सर्व निकषांवर काळजी घेण्यात आल्याचा विश्वास त्यांनी दिला.

लस घेतल्यानंतर होणाऱ्या काही परिणामांबाबत सांगताना, हलकी डोकेदुखी किंवा किरकोळ ताप जाणवू शकतो. पण, अशा वेळी पॅरासिटामॉलच्या गोळीने परिस्थिती नियंत्रणात येईल, त्यासाठी चिंता करण्याचे किंवा गोंधळण्याचे कारण नसल्याचा हा महत्त्वाचा मुद्दा अदर पुनावाला यांनी त्यांनी मांडला. लसीच्या पहिल्या डोसनंतर नेमकी कोणती काळजी घ्यावी याबाबत सांगताना ते म्हणाले, लसीचा पहिला किंवा पूर्ण डोस घेतल्यानंतरही मास्कचा वापर हा बंधनकारकच आहे. कारण, लस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग नाकारता येत नाही. कारण, ही लस काही बुलेटप्रूफ नसल्यामुळे सावधगिरी म्हणून मास्कचा वापर हा झालाच पाहिजे.

भारतात कोरोना लसीकरणाची पहिली मोहीम येत्या काही आठवड्यात सुरु होईल, असेही अदर पुनावाला यांनी सांगितले. पुनावाला म्हणाले की, धोका पत्करुन लस बनवण्याचा निर्णय सीरम इन्स्टिट्यूटने घेतला होता, आता तो योग्य असल्याचे वाटते. ही लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे सांगताना लवकरच लसीकरणाला सुरुवात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठीचे देशभरात अनेक प्रयत्न सुरु असतानाच आता कोरोना प्रतिबंधक लसींच्या आपातकालीन वापराला मिळालेली परवानगी हा देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. असे असले तरीही गाफिल वर्तन करत कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न करण्याची हेळसांड करु नका, असाच आग्रही सूर पुनावाला यांनी आळवला.