अमेरिका – जो अपराध केला नाही, त्या अपराधाच्या आरोपाखाली एका तरुणाला सुमारे 27 वर्षे तुरुंगात डांबण्यात आले. आता त्या तरुणाचा गुन्ह्याशी संबंध नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्यामुळे सरकारकडून त्याला 72 कोटींची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
न केलेल्या अपराधाची 27 वर्षे शिक्षा भोगणाऱ्या व्यक्तीला सरकार देणार 72 कोटींची नुकसानभरपाई
चेस्टर हॉलमॅन नावच्या कृष्णवर्णीय तरुणाला अमेरिकेतील फिलाडेल्फियामध्ये एका हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. एक दोन वर्षे नव्हे तर सुमारे 27 वर्षे या हत्येप्रकरणी त्याला तुरुंगात डांबण्यात आले होते. पण आता या प्रकरणातील सत्य उघड झाल्यानंतर या हत्येशी चेस्टर याचा संबंध नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याची 2019 मध्ये तरुंगातून सुटका करण्यात आली.
1991 मध्ये एका मुख्य साक्षीदाराने खोटी साक्ष देत या प्रकरणात चेस्टरला गोवल्याचे तपासात उघड झाल्यामुळे आपण निर्दोष असूनही आपल्याला 27 वर्षे तुरुंगात डांबल्याचा आरोप करत चेस्टरने स्थानिक राज्य सरकारविरोधात खटला दाखल केला होता. फिलाडेल्फियाच्या राज्य सरकारने त्याच्या याचिकेची दखल घेत त्याला नुकसान भरपाई देण्याचे ठरवले. त्याला सुमारे 72 कोटींची नुकसान भरपाई देण्यात आली आहे.
या प्रकरणाचा दोन्ही पक्षांनी सामंजस्याने निपटारा केला असून राज्य सरकार किंवा कोणत्याही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची या कराराप्रमाणे या प्रकरणात चूक नसल्याचे मान्य करण्यात आले आहे. मुख्य साक्षीदाराची खोटी साक्ष आणि तत्कालीन परिस्थितीमुळे चेस्टरला 27 वर्षे तुंरुगात खितपत पडावे लागले. त्यासाठी राज्य सरकार चेस्टरला 72 कोटींची नुकसान भरपाई देत आहे, असेही करारात स्पष्ट करण्यात आले आहे.
या करार योग्य असल्याचे तसेच चेस्टरला निर्दोष मुक्त करून ही नुकसान भरपाई सन्मानाने देण्यात येणार आहे. पण कोणत्याही व्यक्तीच्या स्वातंत्र्याची किंमत कितीही मोठ्या रकमेने होऊ शकत नसल्याचे फिलाडल्फियाचे महापौर जिम केन्नी यांनी म्हटले आहे. चेस्टरचे स्वातंत्र्य या शिक्षेमुळे हिरावले गेले. त्याची किंमत करता येणे शक्य नसल्याचे सांगत त्यांनी खेद व्यक्त केला आहे.
चेस्टरने सुमारे 28 वर्षांनंतर मिळालेल्या स्वातंत्र्याचा अनुभव सुखद असल्याचे म्हटले आहे. आपल्यासाठी हा करार सुखद आणि खेदजनकही आहे. आपली उमेदीची वर्षे तुरुंगात गेली, याचा खेद आहे. तर आता उर्वरित आयुष्य सन्मानाने जगता येणार असल्याचे समाधान आहे, असे त्याने सांगितले. तसेच जगासमोर या प्रकरणातील सत्य आल्याने आपण निर्दोष असल्याचे सिद्ध झाले. त्याचा आनंद असल्याचेही त्याने सांगितले.
जो गुन्हा केलेला नसतो, त्याची शिक्षा अनेकांना का भोगावी लागते, हा प्रश्न आपल्याला पडला आहे. अशा अनेकांना आपण तुरुंगात भेटलो, ज्यांचा गुन्ह्याशी संबंध नाही, तरीही ते शिक्षा भोगत आहे. सत्याची लढाई खडतर असली तरी, त्यात सत्याचा विजय होतो. त्यासाठी अंतिम क्षणापर्यंत लढण्याची तयारी ठेवावी लागते, असेही चेस्टर याने सांगितले.