इबोलाचा शोध लावणाऱ्या डॉक्टरने दिला कोरोनापेक्षाही भयंकर व्हायरसच्या संसर्गाचा इशारा


नवी दिल्ली – मागील वर्षभराहून अधिक काळापासून संपूर्ण जग कोरोना या महामारीचा सामना करत असून आता अनेक देशांनी कोरोना लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. असे सगळे घडत असतानाच संपूर्ण जगाला आता धोकादायक अशा इबोला विषाणूचा शोध लावणाऱ्या वैज्ञानिकाने नवा इशारा दिला आहे.

वैज्ञानिक जीन-जॅक्स मुयेम्बे तामफूम यांनी सीएनएनला दिलेल्या मुलाखतीमध्ये संपूर्ण जगाने आता कोरोनापेक्षाही धोकादायक अशा विषाणूचा सामना करण्यासाठी तयार रहावे, असे मत व्यक्त केले आहे. डिसीज एक्स (Disease X) असे या आजाराला जीन यांनी म्हटले आहे. या आजाराचे रुग्ण जगातील अनेक देशांमध्ये असून या आजाराचे अनेक रुग्ण कांगोमध्येही आढळून येत असल्याचा दावा जीन यांनी केला आहे.

प्राध्यापक जीन यांनी डिसीज एक्स असे या नव्या संसर्गजन्य आजाराचे नाव ठेवले आहे. हा विषाणू खूपच घातक असल्याचे सांगण्यात येत आहे. सन १९७६ मध्ये इबोला विषाणूचा शोध प्राध्यापक जीन यांनी लावला होता. आपण अशा काळामध्ये आज जग आहोत, जिथे नवीन विषाणू मानवासमोर येतील आणि ते मानवासाठी धोकादायक ठरतील, असे मत जीन यांनी व्यक्त केले आहे. प्राध्यापक जीन भविष्यामध्ये येणारी संसर्गजन्य आजाराची साथ ही सध्याच्या करोनापेक्षाही भयंकर असेल असा आपला अंदाज असल्याचे सांगतात.

हा नवा विषाणू जास्त धोकादायक असण्याबरोबरच तो मोठ्याप्रमाणात नुकसान करणाराही ठरणार असल्याचेही जीन म्हणाले आहेत. कांगोमधील इगेंडे येथे एका महिलेला अचानक रक्तस्त्राव आणि तापाची लक्षण जाणवू लागली. या महिलेची इबोला चाचणी करण्यात आली, पण त्याचा निकाल निगेटिव्ह आला. ही महिला डिसीज एक्सची पहिली रुग्ण असल्याची भीती डॉक्टरांना आहे. कोरोनाप्रमाणेच हा आजार वेगाने पसरु शकतो. या विषाणूच्या संसर्गाने मरण पावणाऱ्यांची संख्या इबोलाने दगावणाऱ्या रुग्णांच्या संख्येपेक्षा ५० ते ९० टक्के जास्त असू शकते, अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार सध्या डिसीज एक्स हा विषाणू वैज्ञानिकांच्या माहितीनुसार काल्पनिक आहे. पण या विषाणूचे वर्णन ज्या पद्धतीने केले जात आहे, त्याच वेगाने त्याचा प्रसार होत असल्यास जगभरामध्ये त्याचा फैलाव होण्यापासून थांबवणे अंत्यंत कठीण असल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

जेव्हा पहिल्यांदा या रहस्यमय विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या महिलेच्या रक्ताचा नमुना प्राध्यापक जीन यांनी घेतला होता तेव्हा त्यांनी हे इबोलाचे प्रकरण असल्याचा म्हटले होते. इबोलाचा संसर्ग झाल्यानंतर सामान्यपणे रक्तस्त्राव होऊ लागतो आणि रुग्णाचा मृत्यू होतो. जेव्हा पहिल्यांदा इबोलाचा विषाणू सापडला होता तेव्हा यामबूकू मिशन रुग्णालयातील ८८ टक्के रुग्ण आणि ८० टक्के कर्मचाऱ्यांचा या विषाणूच्या संसर्गानेच मृत्यू झालेला.

जो नमुना जीन यांनी घेतला होता तो बेल्जियम आणि अमेरिकेत संशोधनासाठी पाठवण्यात आला. तेथील संशोधनकांनी या नमुन्यातील रक्तामध्ये अळीच्या आकाराचे काही विषाणू असल्याचे आढळून आले. आता जीन यांनी एकाकडून दुसऱ्याला संसर्ग होणारे अनेक आजार भविष्यात डोके वर काढू शकतात, असा इशाराच दिला आहे.

यल्लो फिव्हर, अनेक प्रकारचे इन्फ्युएन्जा, रेबीज आणि इतर काही विषाणुंचा मागील काही वर्षांपासून प्राण्यांमधून मानवाला संसर्ग झाला आहे. यापैकी अनेक आजार हे उंदीर आणि किड्यांमुळे मानवी शरीरात दाखल झाले आहेत. प्लेगची साथ जगामध्ये यापूर्वीही येऊन गेली. प्राण्यांची मूळ राहण्याची ठिकाणे नष्ट केली जात आहेत, प्राण्यांसंदर्भातील व्यापार झपाट्याने वाढत असल्याच्या दोन मुख्य कारणांमुळे प्राण्यांपासून मानवाला संसर्ग होणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढल्याचा अंदाज तज्ज्ञ मंडळी व्यक्त करतात.

मोठे प्राणी नैसर्गिक निवारा नष्ट झाल्यास नामशेष होऊन नष्ट होतील, पण उंदीर, वटवाघुळ आणि किड्यांच्या माध्यमातून संसर्ग होईल. मानवाला प्राण्यांपासूनच सार्स, मर्स आणि कोरोनासारख्या विषाणूंचा संसर्गही झाला आहे. वटवाघुळाच्या माध्यमातून कोरोनाचा सर्वात प्रथम संसर्ग चीनमधील वुहान शहरामध्ये मानवाला झाल्याचे सांगण्यात येते. जगभरातील लाखो लोकांचा या विषाणूने जीव घेतला आहे.

ब्रिटनमधील एडिनबर्ग विद्यापिठाच्या संशोधनानंतर जगभरामध्ये दर तीन ते चार वर्षांच्या अंतरानंतर नवीन विषाणू सापडत आहे. प्राध्यापक मार्क वूलहाऊस यांनी दिलेल्या माहितीनुसार प्राण्यांमधून यापैकी अनेक विषाणूंचा मानवामध्ये संसर्ग होतो. इबोला, कोरोनासारख्या विषाणूंचा मानवाला संसर्ग जंगली प्राण्यांचे मांस खाण्याचे प्रकार सुरु ठेवल्यास होत राहील. वुहानसारख्या ठिकाणी जिथे जिवंत प्राणी विकले जातात तिथे अशा संसर्गाचा धोका अधिक असतो. या प्राण्यांपैकी कोणत्या एखाद्या प्राण्यामध्ये डिसीज एक्सचा विषाणू असू शकतो, अशी भीतीही प्राध्यापक मार्क यांनी व्यक्त केली.