आता मध्य रेल्वे देखील भाड्याने देणार ई-बाईक


मुंबई – मध्य रेल्वेच्या लोकलने मुंबईपर्यंतचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी एक खास सेवा लवकरच सुरू होत आहे. नवी मुंबई पालिका, मुंबई मेट्रो वन आणि एमएमआरडीएच्या धर्तीवर आता इलेक्ट्रिक बाईक मध्य रेल्वेही भाडय़ाने उपलब्ध करणार आहे.

ही सुविधा फेब्रुवारी अर्थात या महिन्यातच मध्य आणि हार्बर मार्गाला जोडणाऱ्या सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांपेकी एक असलेल्या महत्वाच्या स्थानकात उपलब्ध होणार असल्याने रिक्षा, टॅक्सी आणि बसेसच्या रांगेत प्रवाशांना उभे राहण्याची गरज राहणार नाही. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद बीकेसीमधील ‘युलु ई-बाईक’ सेवेला मिळत असल्यामुळे ही सेवा प्रवाशांसाठी मध्य रेल्वेनेदेखील उपलब्ध केली आहे.

मोबाईल अ‍ॅपवर चालणाऱ्या भाडेतत्त्वावरील ‘युलु ई-बाईक’ फेब्रुवारी अर्थात या महिन्यामध्येच मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकात प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, घाटकोपर, ठाणे, मुलुंड आणि भांडूप या स्थानकांवरही ही सेवा लवकरच सुरू करण्याची मध्य रेल्वेची तयारी सुरू आहे. महिनाभरात कुर्ला स्थानकाच्या पश्चिम बाजूला 80 ई-बाईक बीकेसी तसेच आजूबाजूच्या परिसरात जाण्यासाठी उपलब्ध असणार असून मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हिजनने त्यासंबंधित टेंडरचे वाटपही केले आहे.

प्रवाशांसाठी एकूण 80 इलेक्ट्रिक बाईक उपलब्ध असणार आहेत. या मोबाईल कुर्ला पश्चिम येथून बीकेसी तसेच अन्य नजीकच्या ठिकाणी जाण्यासाठी अ‍ॅप आधारित बाईक उपलब्ध केल्या जाणार आहेत. या ई-बाईक्स कुर्ला स्टेशन परिसरात ठेवण्यात येणार आहेत. या बाईक्स लॉक असतील. त्या अनलॉक करण्यासाठी युलू अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर बाईक अनलॉक करण्यासाठी बाईकवरचा QR कोड स्कॅन करुन अवघे पाच रुपये द्यावे लागतील. नंतर प्रत्येक एका मिनिटासाठी १.५ रुपये म्हणजेच साधारण १० मिनिटांसाठी तुम्हाला फक्त १० ते १५ रुपये या हिशोबाने बाईक वापरण्याचे भाडे आकारले जाईल.

या ई-बाईक चालविण्यासाठी तुमच्याकडे लायसन्स असण्याची गरज नाही. ई-बाइक स्थानकावरून घेताना उपलब्ध बॅटरीनुसार किती किमी अंतर कापले जाऊ शकते याची माहितीही अ‍ॅपवर उपलब्ध असेल. बॅटरी पूर्ण चार्ज असताना ५५ किमी अंतर कापेल. ट्रॅफिक आणि प्रदूषणाला या सेवेमुळे चांगलाच आळा बसेल. बाईक वापरून झाल्यावर ती पुन्हा जवळच्या स्टेशनवर लॉक केली की काम संपले. आजूबाजूच्या परिसरात ई-बाईक स्टेशन्स कुठे आहेत हे दाखवणारा नकाशा युलू अ‍ॅपवर उपलब्ध असेल.