फ्री कॉलिंगच्या गिफ्टनंतर युजर्सना जिओने दिला झटका


नवी दिल्ली – देशात सर्व नेटवर्कसाठी IUC म्हणजेच Interconnect Usage Charges पूर्णपणे 1 जानेवारीपासून बंद करत जिओने पुन्हा एकदा कॉलिंग सेवा विनामूल्य केली. फ्री कॉलिंगचे नववर्षात आपल्या ग्राहकांना गिफ्ट दिल्यानंतर कंपनीने आता आपल्या ग्राहकांना एक झटका दिला आहे. आपल्या टॉक टाइम प्लॅनमध्ये मिळणाऱ्या फ्री डेटाची ऑफर रिलायन्स जिओने बंद केली आहे. त्याचबरोबर जिओच्या 4G डेटा व्हाउचर्समध्येही आता व्हॉइस कॉलिंगची सेवा मिळणार नाही.

जिओने 2020 च्या सुरूवातीला आपल्या टॉक टाइम प्लॅनसोबत 100GB पर्यंत फ्री डेटा व्हाउचर आणि 4G डेटा व्हाउचर्ससोबत नॉन-जिओ नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1000 मिनिटे देण्याची घोषणा केली होती. आतापर्यंत जिओकडून ऑफ-नेट कॉलवर 10 रुपये खर्च करणाऱ्या युजर्सना 1 जीबी डेटा दिला जात होता. म्हणजे 1 हजार रुपयांच्या टॉक टाइम प्लॅनसोबत 100 जीबी फ्री डेटा दिला जात होता. पण कंपनीने आता प्रत्येक नेटवर्कवर व्हॉइस कॉलिंग फ्री केल्यामुळे फ्री डेटा व्हाउचर बंद केले आहेत.

10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 500 रुपये आणि 1 हजार रुपयांपर्यंतचे टॉक टाइम प्लॅन जिओकडे आहेत. यामध्ये 100 जीबीपर्यंत मोफत डेटा मिळतो. पण हे प्लॅन्स आता केवळ टॉक टाइमसह येतील. याशिवाय कंपनीने 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये आणि 401 रुपयांच्या जिओ 4G डेटा व्हाउचर्समध्येही बदल केला आहे.

आतापर्यंत 11 रुपयांच्या 4G डेटा व्हाउचरमध्ये नॉन-जिओ नेटवर्कवर 75 मिनिटे, तर 101 रुपयांच्या पॅकमध्ये 1 हजार मिनिटे मिळायची. याशिवाय डबल डेटाचा फायदाही या डेटा व्हाउचर्समध्ये मिळायचा. पहिले 11 रुपयांचा 4G डेटा व्हाउचर प्लॅन 400MB डेटा बेनिफिट्ससह यायचा, पण आता यामध्ये 800MB डेटा मिळत आहे. कंपनीने आपल्या 4G डेटा व्हाउचर्सच्या डेटा बेनिफिटमध्ये बदल केलेला नाही, पण नॉन-जिओ कॉलिंग बेनिफिट हटवले आहेत. म्हणजे आता या 4G डेटा व्हाउचर्समध्ये व्हॉइस कॉलिंगचे फायदे मिळणार नाही.