औरंगाबाद नामांतर ; नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंचा जुना व्हिडीओ शेअर करत लगावला टोला


मुंबई : राज्यात सध्या औरंगाबादच्या नामांतरावरुन राजकीय कलगीतुरा अद्याप सुरूच आहे. शिवसेनेची औरंगाबाद शहराचे नामांतर करुन संभाजीनगर हे नाव देण्याची आग्रही मागणी आहे. पण शिवसेना गेली 5 वर्षे सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नसल्यामुळे भाजप, मनसे यांच्याकडून शिवसेनेवर टीका करण्यात येत आहे.

माध्यमांमध्ये औरंगाबादचे नाव बदलण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे वृत्त झळकल्यानंतर, आमचा त्यास विरोध असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ठामपणे सांगितल्यामुळे विरोधी पक्षांनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याची सुरुवात केली आहे. त्यावरुन आता भाजप आमदार नितेश राणे यांनी मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ शेअर करत टोला लगावला आहे.


आदित्य ठाकरेंचा औरंगाबादमधील भाषणाचा एक जुना व्हिडिओ नितेश राणे यांनी ट्विटवर शेअर केला आहे. आदित्य ठाकरेंनी या व्हिडिओमध्ये औरंगाबादच्या नामांतरावर भाष्य केले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांनी संभाजीनगर न बोलता औरंगाबाद म्हटले की त्यांना चपलेने मारायचे. त्यांना शेण खायायची सवय असल्याचे आदित्य ठाकरे व्हिडिओमध्ये बोलताना दिसत असल्यामुळे आता शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर देण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.