चौकशीच्या एक दिवस आधीच संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत ईडी कार्यालयात दाखल


मुंबई – आज दुपारी अचानक संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत या ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्या आहे. ईडीने वर्षा राऊत यांना पीएमसी बँकेतील ठेवींबाबत चौकशीसाठी २९ डिसेंबर रोजी उपस्थित राहण्याचे समन्स बजावण्यात आल्यानंतर वर्षा राऊत यांनी चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती. ईडीने तेव्हा वर्षा राऊत यांना ५ जानेवारी रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याची सूचना दिली होती. दरम्यान, वर्षा राऊत या एक दिवस आधीच ईडीसमोरच चौकशीसाठी उपस्थित झाल्या आहेत.

१२ वर्षांपूर्वी निकटवर्तीय प्रकाश राऊत यांच्याकडून पीएमसी बँकेत वर्षा राऊत यांच्या खात्यात ५० लाख रुपये भरण्यात आले होते. प्रकाश राऊत व त्यांच्या पत्नीचा याबाबत जबाब नोंदविण्यात आला असून गेल्या दीड महिन्यापासून ईडी वर्षा राऊत यांच्याकडे पत्रव्यवहार करून विचारणा करीत आहे. पण अपेक्षित प्रतिसाद त्यांच्याकडून न मिळाल्याने २९ डिसेंबरला त्यांना ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात आले होते. पण संजय राऊत यांनी भाजपकडून ही राजकीय सुडातून कारवाई सुरू असल्याची टीका केली.

दरम्यान, ईडीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना बजावलेल्या समन्सवरून राजकारणही पेटले आहे. शिवसेनेकडून ईडी आणि भाजपवर जोरदार टीका करण्यात आली होती. तसेच ईडीच्या मुंबईतील कार्यालयावर काही दिवसांपूर्वी भाजपा प्रदेश कार्यालय अशा आशयाचे बॅनरही झळकवण्यात आले होते.