दिल्ली-मेरठ कॉरिडॉरमधील भूयारी मार्ग बांधणार चिनी कंपनी


नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळाकडून (NCRTC) दिल्ली ते मेरठ या मार्गादरम्यान तयार करण्यात येणाऱ्या रॅपिड रेल ट्रान्झिट सिस्टीम अंतर्गत येणाऱ्या भूयारी मार्गाचे कंत्राट चिनी कंपनी शांघाई टनल इंजिनिअरिंग कंपनीला हे कंत्राट देण्यात आल्याचे समोर आले आहे.

देशात प्रथमच राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळाकडून रॅपिड रेल ट्रान्झिट सिस्टीम उभारण्याचे काम सुरू आहे. भारत-चीन सीमावादावरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चिनी कंपनीला देण्यात आलेले कंत्राट रोखण्यात आले होते. पण आता शांघाई टनल इंजिनिअरिंग कंपनीच्या कंत्राटाला पुन्हा एकदा मान्यता देण्यात आली आहे. दिल्लीतील न्यू अशोक नगर ते गाझियाबाद येथील साहिबाबाद दरम्यान जमिनीखालून जाणारा दिल्ली-मेरठ कॉरिडॉर अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या रॅपिड रेल ट्रान्झिट सिस्टीममध्ये ५.६ किमीचा मार्ग चिनी कंपनी तयार करणार आहे.

राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या स्तरावरून कंत्राट देण्यासाठी परवानगी घेण्यात आली आहे. तसेच सर्व नियमांचे आणि प्रक्रियांचे पालन कंत्राट देताना करण्यात आले आहे. एकूण ८२ किमी अंतराच्या दिल्ली-गाजियाबाद-मेरठ कॉरिडोअरसंबंधी सर्व नागरी कामांचे कंत्राट देण्यात आले असून, दिलेल्या मुदतीत काम पूर्ण होईल, अशा पद्धतीने बांधकाम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

सेमी हायस्पीड प्रकल्प दिल्ली-मेरठ दरम्यान तयार करण्यात येत आहे. एकूण ८२.१५ किमी लांबीच्या प्रकल्पापैकी ६८.०३ किमी उन्नत मार्ग, तर १४.१२ किमीचा भूयारी मार्ग असेल. शांघाई टनल इंजिनिअरिंग कंपनीची बोली या भूयारी मार्गापैकी ५.६ किमी मार्गासाठी सर्वात कमी होती. शांघाई टनल इंजिनिअरिंग कंपनीने जून २०२० मध्ये काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत १ हजार १२६ कोटी रुपयांची बोली लावली होती. तर भारतीय कंपनी असलेल्या ‘एल अँड टी’ने १ हजार १७० कोटी रुपयांची आणि टाटा प्रोजेक्ट व एसकेईसी के. जेव्ही या कंपन्यांनी १ हजार ३४६ कोटी रुपयांची बोली लावली होती.