महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये मेगा नोकर भरती


मुंबई – तंत्रज्ञ, अभियंत्यासह अनेक जागांसाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने नोकर भरती काढली आहे. यासाठी महाराष्ट्र मेट्रोने अर्ज मागवले आहेत. भरण्यात येणाऱ्या विविध पदांसाठी असलेली शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार mahametro.org या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेगवारांना २१ जानेवारी २०२१ अंतिम तारीख असेल.

त्याचबरोबर पुणे मेट्रो रेल प्रोजेक्टमध्ये देखील विविध पदांसाठी भरती आहे. त्यासाठी असलेली शैक्षणिक योग्यता वेगवेगळी आहे. १० वी उत्तीर्णांपासून पदवीधारक यासाठी अर्ज करू शकतात. १० वी उत्तीर्ण उमेदवार तंत्रज्ञ पदांसाठी अर्ज करू शकतात. पण NCVT/SCVT मान्यता प्राप्त संस्थांचे आयटीआय प्रमाणपत्र या उमेदवारांकडे असायला हवे. तर स्टेशन नियंत्रक आणि कनिष्ठ अभियंता पदांसाठी अर्ज करताना मान्यता प्राप्त संस्थेमधून अभियांत्रिकीच्या संबंधित विषयात तीन वर्षांचा डिप्लोमा पूर्ण केलेला असावा. सेक्शन अभियंता या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यता प्राप्त संस्थेतून संबंधित विषयात बीई किंवा बीटेकचं शिक्षण घेतलेले असावे.

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनमधील (MMRC) तंत्रज्ञ, अभियंत्यासह इतर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेगवाराचे किमान वय १८ वर्षे, तर कमाल वय २८ वर्षे असावे लागणार आहे. या पदांसाठी अर्ज करताना जनरल आणि ओबीसी वर्गातील उमेदवारांना ४०० रुपये शुल्क भरावे लागेल. तर अन्य उमेदवारांना १५० रुपये भरावे लागेल. त्याचबरोबर सर्व पदांसाठी निवड करताना आधी लेखी परीक्षा होईल. त्यानंतर मुलाखत घेतली जाईल.

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे अधिकृत संकेतस्थळ असलेल्या mahametro.org च्या माध्यमातून इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज भरण्याची प्रक्रिया १४ डिसेंबर २०२० पासून सुरू झाली असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख २१ जानेवारी २०२१ आहे.