एकनाथ खडसेंच्या कोरोना अहवालात काहीतरी गौडबंगाल; शिवराम पाटील यांचा आरोप


जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचा कोरोना अहवाल ईडीच्या नोटीसनंतर पॉझिटिव्ह आला आहे. पण सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांनी पत्रकार परिषद घेत त्यातील तारखांचा विचार केला तर या अहवालात काहीतरी गौडबंगाल असल्याचा आरोप केला आहे.

पत्रकार परिषद घेताना काही मुद्दे शिवराम पाटील यांनी मांडले आहेत. त्यात खडसे हे 30 डिसेंबरला होणाऱ्या ईडीच्या चौकशीसाठी 27 तारखेला जळगावहुन मुंबईकडे रवाना झाले होते. ते 28 तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटल्याचा खुलासा खडसे यांच्या कार्यकर्त्यांनी माध्यमांकडे केल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.

जळगाव सिव्हिलमधील 29 ला खडसे यांचा ओपीडी रेकॉर्डचा विचार केला तर त्या दिवशी त्यांनी स्वॅब दिल्याचे समोर येते तर खडसे यांचा स्वॅब त्याच दिवशी उप जिल्हा रुग्णालय मुक्ताईनगरहुन देखील तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात येतो आणि त्यांचा अहवाल 30 डिसेंबरला पॉझिटिव्ह येतो. हे सर्व पाहता एकाच वेळेस दोन ठिकाणी खडसे यांचा स्वॅब कसा घेतला जाऊ शकतो. या शिवाय त्याच दिवशी ते मुंबईत असू शकतील का की हा स्वॅब अन्य कोणाचा घेतला आहे, असा सवाल शिवराम पाटील यांनी उपस्थित केला आहे.

त्याचबरोबर खडसे यांची कोरोना टेस्ट जर पॉझिटिव्ह आल्याचे 30 तारखेला समोर आले होते. तर मुख्यमंत्री यांना ते 28 तारखेला भेटले आहेत, तर मुख्यमंत्री यांची भेट घेतल्यामुळे उद्धव ठाकरे यांची आणि खडसे यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची कोरोना चाचणी करायला पाहिजे होती. शिवाय त्यांनीही क्वॉरंटाईन व्हायला पाहिजे होते. पण, तसे झालेले नसल्याने एकनाथ खडसे आणि उद्धव ठाकरे यांना हे सर्व गौडबंगाल माहीत आहे, हा प्रशासनाचा गैर वापर असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

खडसे हे पॉझिटिव्ह असल्याने त्यांच्यावर घरी नव्हे तर रुग्णालयात उपचार केले जायला पाहीजे होते. पण खडसे यांची टेस्ट आणि त्यांचा अहवाल हा खरा आहे का? असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला आहे. शिवराम पाटील हे माहिती अधिकार आणि सामाजिक कार्यकर्ते राहिले असून जळगाव जागृत मंचच्या माध्यमातून त्यांनी नेहमीच राजकीय नेत्यांच्या विरोधात आपला आवाज उठवला आहे. एकनाथ खडसे यांच्या कोरोनाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे राजकीय गोटात मात्र चर्चेचा विषय बनला आहे.