मुंबई : अभिनेत्री आणि कलाविश्वाकडून राजकीय वर्तुळाकडे वळलेल्या उर्मिला मातोंडकर यांच्या नावाच्या बऱ्याच चर्चा मागील वर्षी म्हणजेच 2020 मध्ये रंगल्या होत्या. या चर्चा रंगण्यामागची कारणे देखील तशीच होती. कंगनासोबतचा वाद असो अथवा शिवसेनेतील पक्ष प्रवेश असो. चर्चांचा गराडा उर्मिला यांच्या नावाभोवती पाहायला मिळालाच. आता उर्मिला यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर काही आठवड्यांतच मुंबईच्या प्रसिद्ध भागात एक नवे ऑफिस खरेदी केले आहे.
उर्मिला मातोंडकरांनी शिवसेनेत प्रवेश करताच कोट्यावधींच्या ऑफिसची खरेदी
यासंदर्भातील वृत्त मुंबई मिररने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार या जागेचा अंतिम व्यवहार 2020 या वर्षाच्या अखेरीस करण्यात आला. मोक्याच्याच ठिकाणी जवळपास 1000 चौरस फुटांची ही जागा असल्याचे सांगितले जात आहे. मुंबईतील खार पश्चिम भागात असणाऱ्या लिंकिंग रोड येथे त्यांच्या ऑफिसची इमारत आहे. शिवाय तिथे कार्यालयीन जागांसाठी दरमहा 5-8 लाख रुपये एवढे भाडे आकारले जात असल्याची माहिती समोर येत आहे. उर्मिला यांचे नवे ऑफिस सहाव्या मजल्यावर असून त्यांनी या जागेची खरेदी एका व्यावसायिकाकडून केली असून, यासाठी तब्बल 3.75 कोटी एवढी मोठी रक्कम मोजल्याचे सांगितले जात आहे.