‘भारत बायोटेक’च्या ‘कोव्हॅक्सीन’लाही तज्ज्ञ समितीची मंजुरी


नवी दिल्ली – शनिवारी आणखी एका कोरोना प्रतिबंधक लशीच्या आपातकालीन वापरास केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या तज्ज्ञ समितीने मंजुरी दिली. ‘भारत बायोटेक’ने ‘कोव्हॅक्सीन’ ही लस देशात विकसित आणि उत्पादित केली आहे. तत्पूर्वी केंद्रीय औषध मानक नियंत्रक संघटनेच्या (सीडीएससीओ) तज्ज्ञ समितीने शुक्रवारी ‘ऑक्सफर्ड’ने विकसित केलेल्या आणि सीरम इन्स्टिटय़ूटने उत्पादित केलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ लशीच्या आपातकालीन वापरास मंजुरी दिली. त्यापाठोपाठ शनिवारी तज्ज्ञांच्या समितीने ‘कोव्हॅक्सीन’ लशीच्या आपातकालीन वापरास काही शर्तीवर मंजुरी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हैदराबाद येथील ‘भारत बायोटेक’ने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) सहकार्याने ‘कोव्हॅक्सीन’ लस विकसित केली आहे. ही पहिली स्वदेशी लस आहे. शुक्रवारप्रमाणे शनिवारीही भारत बायोटेकने पुन्हा ‘सीडीएससीओ’च्या तज्ज्ञ समितीपुढे अतिरिक्त माहिती, वस्तुस्थिती आणि विश्लेषणाचे सादरीकरण केल्यानंतर लशीच्या आपातकालीन वापरास तज्ज्ञ समितीने मंजुरी देऊन, अंतिम वापराची शिफारस केल्याचे सूत्रांनी सांगितले.

‘भारत बायोटेक’ने भारताच्या औषध महानियंत्रकांकडे (डीसीजीआय) ७ डिसेंबर ‘कोव्हॅक्सीन’च्या आपातकालीन वापरासाठी रोजी अर्ज केला होता. शुक्रवारीच ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनेकाने विकसित केलेल्या आणि पुण्यातील ‘सीरम’ संस्थेने तयार केलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ या लशीच्या वापरास ‘सीडीएससीओ’च्या तज्ज्ञ समितीने मंजुरी देऊन तशी शिफारस ‘डीसीजीआय’ यांच्याकडे केली होती. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना लसीकरण सुरू करताना सुरूच राहतील, कोणत्याही परिस्थितीत त्याबाबत तडजोड केली जाणार नाही आणि पहिल्या टप्प्यात एक कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे त्याचबरोबर आघाडीवर काम करणाऱ्या दोन कोटी कर्मचाऱ्यांचे विनाशुल्क लसीकरण करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले.

एक कोटी आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवर काम करणाऱ्या दोन कोटी कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यात विनाशुल्क लसीकरण करण्यात येईल, असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले. येत्या जुलैपर्यंत ५० वर्षांवरील आणि त्याखालील जोखमीच्या गटातील नागरिकांसह २७ कोटी नागरिकांना लस देण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोरोना लशीच्या परिणामकारकता आणि सुरक्षितता याविषयीच्या अफवा पसरवू नयेत आणि त्यांवर विश्वासही ठेऊ नये, असे आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केले. लसीकरण सुरू करताना कोरोना संसर्ग प्रतिबंधक उपाययोजनांबाबत तडजोड केली जाणार नाही, त्या सुरूच राहतील, असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.