अंत्यसंस्कारावेळी स्मशानभूमीचे छत कोसळल्यामुळे 15 जणांचा मृत्यु


गाझियाबाद: अत्यंत हृदयद्रावक घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे घडली असून एका वयोवृ्द्ध व्यक्तीवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सुरू असतानाच स्मशानभूमीचे सिमेंटचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 15 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अजूनही 10 ते 12 जण या सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली दबले असून त्यांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची गंभीर दखल घेत त्यांनी प्रशासनाला या दुर्घटनेचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाखांची आर्थिक मदतही योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केली आहे.

ही दुर्देवी घटना गाझियाबादच्या मुरादनगर परिसरात घडली. राम धन नावाच्या एका वयोवृद्ध व्यकीचा मृत्यू झाल्याने त्यांचे पार्थिव मुरादनगर येथील उखरानी/ बम्बा रोडवरील स्मशानभूमीत आणण्यात आले होते. राम धन यांच्या नातेवाईकांसह एकूण 25 जण यावेळी अंत्यसंस्काराला उपस्थित होते. या परिसरात सकाळपासूनच वादळी वाऱ्यांसह पाऊस सुरू असल्यामुळे लोक स्मशानभूमीत दाटीवाटीने जमा झाले होते. त्यावेळी अचानक स्मशानभूमीचे निर्माणाधीन सिमेंटचे छत कोसळल्यामुळे अनेक लोक या ढिगाऱ्याखाली दबली गेली.

संपूर्ण स्मशानभूमीत ही घटना घडल्याने एकच आक्रोश सुरू झाला. लोकांनी आरडाओरड सुरू केली. ढिगाऱ्याखाली दबलेल्यांनी एकच ओरडा सुरू केल्यामुळे स्थानिकांनी तात्काळ पोलीस आणि एनडीआरएफच्या तुकडीला घटनास्थळी पाचारण केले. घटनास्थळी धाव घेऊन एनडीआरएफच्या टीमने ढिगारा उपसण्याचे काम सुरू केले असून आतापर्यंत 15 जणांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहेत. ढिगारा उपसण्याचे क्रेनच्या सहाय्याने काम अजूनही सुरू असून ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, या घटनेवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. तसेच या घटनेची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत.