औरंगाबादच्या नामांतरास आठवलेंचा विरोध


मुंबई – औरंगाबाद शहराचे नामांतर करुन संभाजीनगर हे नाव या शहराला देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. पण शिवसेना गेल्या 5 वर्षे सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख हेच गेल्या वर्षभरापासून राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही. पण आता नामांतरासाठी हालचाली सुरू असल्याचे वृत्त माध्यमांत झळकल्यानंतर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी, आमचा त्यास विरोध असल्याचे ठामपणे सांगितले. आता, या नामांतरणाला केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंच्या आरपीआयनेही आपला विरोध दर्शवला आहे.

आता राज्यातील राजकारण औरंगाबादच्या नामांतरणावरुन चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. नामांतराला काँग्रेसने विरोध दर्शवल्यानंतर आता या नामांतराला विरोध असल्याचे आरपीआय आठवले गटानेही सांगितले आहे. रामदास आठवलेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन औरंगाबादच्या नामांतराला आपला विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे.