वर्किंग व्हिसासंदर्भात ट्रम्प यांनी घेतला महत्वपूर्ण निर्णय


वॉशिंग्टन – स्लथांतरबंदीचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतल्यामुळे अमेरिकेत प्रवेश करण्यात अनेक “ग्रीन कार्ड” अर्जदार आणि तात्पुरते अमेरिकेत येणाऱ्या परदेशी कामगारांना अडथळा होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना संकटात स्वदेशी लोकांचे उर्वरित रोजगार वाचवण्यासाठी स्थलांतरबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला होता असे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे.

स्थलांतरबंदीचा निर्णय एप्रिल आणि जून महिन्यात घेण्यात आला होता. ही बंदी ३१ डिसेंबरला संपुष्टात येणार होती. पण आता ३१ मार्चपर्यंत ही बंदी वाढवण्यात आली आहे. अनेक उद्योजकांनी जाहीरपणे ट्रम्प सरकारच्या परदेशी कामगारांवर बंदीच्या निर्णयाचा विरोध केला होता. या बंदीच्या निर्णयाचा लवकरच राष्ट्रध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणारे जो बायडन यांनी विरोध केला होता. पण त्यांनी सत्तेत आल्यानंतर निर्णय बदलण्याबद्दल कोणतेही भाष्य केलेले नाही. कोरोनाचा फटका बसला असताना सध्या दोन कोटी लोकांना अमेरिकेत बेरोजगारी भत्ता मिळत आहे.

दरवर्षी मोठया प्रमाणावर परदेशी नागरिक नोकरीसाठी अमेरिकेत येतात. एच १ बी आणि अन्य वर्क व्हिसा त्यांना दिले जातात. तूर्तास तेच व्हिसा स्थगित करण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला होता. अमेरिकेची सतत नाविन्यपूर्ण गोष्टींचा शोध घेण्याची कल्पकता आणि स्पर्धात्मक वातावरण याला दुहेरी फटका बसेल, असा इशारा या आघाडीच्या अमेरिकन कंपन्यांनी दिला होता. पण आता याचा कार्यकाळ अजून तीन महिने वाढवण्यात आला आहे.