उमेश यादवच्या जागी टीम इंडियात टी. नटराजनचा समावेश


मेलबर्न: टी नटराजनचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. भारताचा जलद गोलंदाज उमेश यादवला दुसऱ्या कसोटी सामन्यात दुखापत झाली होती. पुढील दोन्ही सामने तो खेळणार नसल्याचे संघ व्यवस्थापनाने जाहीर केले होते. तेव्हा पासून कोणत्या खेळाडूला यादवच्या जागी संधी मिळणार याची चर्चा सुरू होती. जलद गोलंदाजी म्हणून टी नटराजन आणि शार्दुल ठाकूर या दोघांचे नाव आघाडीवर होते.


उमेश यादवला बॉक्सिंग डे कसोटीत दुखापत झाल्यामुळे उर्वरीत कसोटी मालिकेला तो मुकणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्य़ातील कसोटी मालिका सुरू झाल्यानंतर भारतीय संघाला बसलेला हा दुसरा मोठा झटका आहे. त्याआधी पहिल्या कसोटी सामन्यात मोहम्मद शमीला दुखापत झाली होती. त्यामुळे तो संघाबाहेर झाला. उमेश यादव आणि मोहम्मद शमी हे दोन्ही खेळाडू बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे फिटनेसवर काम करणार असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.

आयपीएलमध्ये टी नटराजनने धमाकेदार कामगिरी केल्यामुळेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या लढतीत त्याला पदार्पणाची संधी मिळाली. त्यानंतरच्या टी-२० मालिकेत देखील त्याने शानदार गोलंदाजी केली होती. टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन लढती गमावल्या होत्या. नवदीप सैनीला अखेरच्या लढतीत दुखापत झाल्याने नटराजनला संघात जागा मिळाली. मार्नस लाबुशेनची विकेट घेत त्याने दमदार पदार्पण केले. पहिल्या सामन्यात त्याने दोन विकेट घेतल्या. नंतर टी-२० मालिकेतील ३ लढतीत त्याने सर्वाधिक ६ विकेट घेत सर्वांचे लक्ष वेधले.