सासरच्या मंडळींनी सुनेला टोमणे मारणे किंवा उपहासात्मक बोलणे हा छळ नाही – मुंबई सत्र न्यायालय


मुंबई : नुकतेच मुंबई सत्र न्यायालयाने मलबार हिल स्थित एका दाम्पत्याला सासरच्या मंडळींनी टोमणे मारणे किंवा उपहासात्मक बोलणे हा वैवाहिक आयुष्याचाच एक भाग असल्याच्या निरीक्षणासह अटकेपासून संरक्षण दिले. ८० वर्षीय सासरे कांतीलाल गुप्ता आणि ७५ वर्षीय सासू मालती गुप्ता त्यांच्यावर हे त्यांच्या सुनेने आरोप केले होते.

सध्या दुबईमध्ये असणाऱ्या तिच्या शालेय मित्राशी 2018 मध्ये विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय़ सदर 30 वर्षीय महिलेने घेतला होता. पण, या नात्याची कायदेशीर नोंदणी करण्यासाठी म्हणून लग्नाच्या काही दिवसांपूर्वी कागदपत्रांची जमवाजमव करत असताना सदर महिलेला आपला पती हा घरकाम करणाऱ्यांचा मुलगा असून, आपल्या होऊ घातलेल्या सासू- सासऱ्यांनी त्याला दत्तक घेऊन मोठे केल्याची बाब समोर आली.

आपल्या सासऱच्यांवर महिलेने केलेल्या आरोपांमध्ये त्यांच्याकडून कधीही काहीच भेट आपल्याला दिली गेली, नसल्याचे तिने सांगितले. त्याचबरोबर दीड कोटी रुपये किंमतीचे दागिने आपल्या आई- वडिलांनीच दिल्याची नोंद तिने केली. तसेच तिच्यावर घरातील फ्रिजला हात न लावणे, लिविंग रुममध्येच राहणे, माहेरी न जाणे असे नियम लादण्यात आले. तिने याबाबत जेव्हा जेव्हा पतीला माहिती देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यानेही तिच्याकडून आपल्या पालकांचे म्हणणे ऐकले गेले पाहिजे या आशयाचे वक्तव्य केले. त्याचबरोबर दुबईहून परतत असताना तिला तिच्या पतीने 15 किलो सुका मेवा दिला होता. तो ज्यावेळी ती सासरी देण्यास गेली, तेव्हा तिच्या सासूने या सुक्यामेव्याचे वजन केल्याचे सुद्धा या महिलेने आरोप करताना म्हटले होते.

दरम्यान, सासू- सासऱ्यांच्या वकिलांच्या माहितीनुसार तिचा पती दत्तक पुत्र असल्याची कल्पनाही सदर महिलेला होती आणि सासरच्या घरी ती लग्नानंतर फक्त दहा दिवस राहिली होती. दोन्हीकडच्या मंडळींकडून एकसारख्या प्रमाणातच लग्नाचा खर्चही केल्याची माहिती त्यांनी दिली. किंबहुना आपल्या अशीलांना त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या या एफआयआरची माहितीच नसल्याचे सांगत त्यांच्या खात्यांतील व्यवहार ठप्प झाले, तेव्हा ही बाब समोर आल्याचे वकिलांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर सुनेचे दागिने त्याच्याकडे असल्याची बाबही त्यांनी फेटाळली.

आरोपकर्त्या महिलेने केलेले हे आरोप पाहता या सहज होणाऱ्या गोष्टी आहेत, असेच विश्लेषण करण्यात आले. विशेष न्यायमूर्ती माधुरी बरालिया यांनी, सूनेला सासू- सासऱ्यांना उपहासात्मक बोलणे आणि टोमणे मारणे हा वैवाहिक जीवनाचाच एक भाग असून हा प्रकार सर्वच कुटुंबांमध्ये घडतो. त्यामुळे 80 आणि 75 वर्षांच्या या सासू – सासऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात येऊ नये, असा निर्णय़ सुनावला.

न्यायालयाने अटकपूर्व जामीनाच्या याचिकेवर सुनावणी करतेवेळी या दाम्पत्याला आपले पासपोर्ट पोलिसांत जमा करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय त्यांना देशाबाहेर किंवा न्यायालयाच्या हद्दीबाहेर जाण्याची मुभा नसेल.