हर्षवर्धन जाधव यांच्या मुलाने आईविरोधात उभे केले वडिलांचे पॅनल


कन्नड – एकीकडे कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना ज्येष्ठ दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. याच दरम्यान राजकारणात हर्षवर्धन जाधव पुन्हा सक्रिय होत असून नुकतीच त्यांच्या पॅनलची घोषणा करण्यात आली आहे. मंगळवारी कन्नड येथे पत्रकार परिषद घेऊन हर्षवर्धन जाधव यांचे सुपुत्र आदित्य जाधव याने वडिलांच्या पॅनलची अधिकृत घोषणा केली आहे.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या आणि त्यांची आई संजना जाधव यांच्या विरोधात आदित्य जाधव याने हर्षवर्धन यांचे पॅनल उभे केल्यामुले आता ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत रायभान जाधव यांची तिसरी पिढीही सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. हर्षवर्धन जाधव यांना अटक झाल्यानंतर सर्व सूत्रे आदित्यने स्वतः हातात घेतली आहेत. राजकीय वाटचाल त्याने सुरू केल्याने राजकारणातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तालुक्यातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून सर्व कार्यकर्ते सोबत असल्याचे आदित्यने म्हटले आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने पत्रकारांनी विचारलेल्या काही खोचक प्रश्नांना अकरावीत असलेल्या आदित्यने नेत्याप्रमाणे समर्पक उत्तरेही दिली आहेत. अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, बंद पडलेली मका खरेदी यासारख्या अनेक समस्यांना सामना सध्या शेतकऱ्यांना करावा लागत आहे. हर्षवर्धन जाधव हे शेतकऱ्यांसाठी राजकारणात सक्रिय होत असून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती निवडणुका लढवणार असल्याची घोषणा आदित्य जाधवने केली आहे. तसेच जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे देखील म्हटले आहे.