राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांना कोरोनाची लागण


मुंबई:- कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव राज्यात कायम असतानाच शिवसेनेच्या आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. राज्याचे कृषीमंत्री व शिवसेना नेते दादा भुसे यांना कोरोनाची लागण झाली असून मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


कोरोनाची लागण झाल्याची माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी स्वतः ट्विट करत दिली आहे. मला कोरोनाची लागण झाली असून संपर्कात आलेल्या सगळ्यांनी काळजी घ्यावी, असा सल्ला दादा भुसे यांनी दिला आहे. तर सध्या आपली प्रकृती ठीक असून लवकरच आपण बरे होऊन कामावर रुजू होईल, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

माझी कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आली असून, माझ्या संपर्कात आलेल्यांनी कृपया तपासणी करून घ्यावी. आपणा सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छांमुळे माझी प्रकृती उत्तम आहे. कोरोनावर यशस्वी मात करून लवकरच मी आपल्या सेवेत रूजू होईन, असे ट्विट दादा भुसे यांनी केले आहे.