दिल्लीत आता वयाची एकवीशी पूर्ण झालेले तरुण बिनदिक्कतपणे रिचवणार पेग


नवी दिल्ली: कोरोनाचं संकटादरम्यान नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर तरुणांनी एकत्र येऊन दारूच्या पार्ट्या झोडू नयेत यासाठी अनेक राज्यांनी संचारबंदी लागू केली आहे. हा निर्णय कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घेण्यात आला आहे. पण दिल्लीमध्ये दारू पिण्याचे वय 25 वरून 21 करण्यात येणार असल्यामुळे दिल्लीतील वयाची एकवीशी गाठलेल्या तरुणांना बिनदिक्कतपणे ग्लासवर ग्लास रिचवण्यात येणार आहेत.

सप्टेंबरमध्ये एक समिती दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी स्थापन केली होती. या समितीचे अबकारी आयुक्त चेअरमन होते. या समितीवर दारूची किंमत, दारू विक्रीच्या व्यवसायात येणाऱ्या अडचणी राज्य उत्पादन शुल्कातील वाढीसाठीचे उपाय शोधण्याचे काम सोपवण्यात आले होते. या समितीने त्याचा अहवाल दिला आहे. त्यात दारू पिण्याचे वय 25 वरून 21 करण्याची शिफारस करण्यात आली आहे. बिअर आणि वाईनला डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये ठेवण्याची तसेच ड्राय डेज घटवून केवळ वर्षातून केवळ तीन वेळाच ड्राय डेज ठेवण्याची शिफारसही करण्यात आली आहे. या शिफारसी दिल्ली सरकारने स्वीकारल्यास दिल्लीतील दारू बाबतचे सर्व नियमच बदलून जाणार आहेत. दरम्यान, समितीच्या या शिफारशींवर दिल्ली सरकारकडून जनतेकडून सल्ला घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

समितीने दिल्ली सरकारला केलेल्या शिफारशी

  • बियर आणि वाईनला विक्रीसाठी डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये ठेवा
  • वर्षातून केवळ तीनच ड्रायडेज असावेत
  • सर्व 272 पालिका वॉर्डात 3-3 दारूची दुकाने असावीत. म्हणजे 272 वॉर्डात 816 दारूची दुकाने असावीत
  • एनडीएमसीमध्ये एकूण 24 रिटेल वेंड्स (दुकाने) असावीत
  • इंदिरा गांधी विमानतळावर एकूण 6 रिटेल वेंड्स असावेत
  • उत्तर प्रदेश आणि हरयाणाप्रमाणे दिल्लीतही दारू पिण्याचं वय 25 वरून 21 करावं
  • सध्या दिल्लीत दारूची 864 दुकाने आहेत. परंतु एका विभागात अनेक दुकाने आहेत, तर दुसऱ्या विभागात अनेक दुकाने आहेत