नवी दिल्ली – कारमधील पुढील सीटवर बसणाऱ्या दोन्ही प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सरकारने आता कारच्या पुढील भागात एअरबॅग अनिवार्य करण्याचा विचार केला आहे. यासंदर्भातील एक प्रस्तावही सादर करण्यात आला असून हा निर्णय अपघाताच्या प्रसंगी प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून घेण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.
कारमध्ये पुढे बसणाऱ्या दोन्ही सीटसाठी आता एअरबॅग अनिवार्य
यासंबंधी एक ड्राफ्ट नोटिफिकेशन मंगळवारी जारी करण्यात आले आहे. कारमधील पुढील सीटवर बसणाऱ्या दोन्ही प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एअर बॅग अनिवार्य करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. हा निर्णय १ एप्रिल २०२१ पासून नव्या गाड्यांसाठी लागू होण्याची शक्यता आहे. तर १ जूनपासून हा नियम सध्या उपलब्ध असलेल्या गाड्यांसाठी लागू होण्याची शक्यता आहे. २८ डिसेंबर रोजी हा ड्राफ्ट रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आला आहे. तसेच यासंबंधी काही सूचना असल्यास त्या ३० दिवसांच्या आत [email protected] या ईमेलवर पाठवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
सरकारच्या या प्रस्तावानंतर फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार एअर बॅग जर अनिवार्य करण्यात आल्या तर गाड्यांच्या किंमतीत वाढ होऊ शकते. त्याचबरोबर विक्रीवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी उत्पादकांना याचा खर्च स्वत:हून करावा लागणार असल्याचेही म्हटले आहे. एअर बॅग अनिवार्य करण्याचा सरकारचा प्रस्ताव हा अतिशय योग्य आहे. हे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य असून ते जागतिक दर्जानुसार बनवले गेले पाहिजेत, असेही मत FADA चे अध्यक्ष विंकेश गुलाटी यांनी सांगितले.