बंगळुरु : रेल्वे रुळाजवळ कर्नाटक विधानपरिषदचे उपसभापती आणि जेडीएसचे नेते एस एल धर्मेगौडा यांचा मृतदेह सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. चिकमंगळुरुमधील कादूरजवळच्या रेल्वे रुळाजवळ त्यांचा मृतदेह दोन तुकड्यांमध्ये सापडला. कदूर पोलिसांच्या माहितीनुसार, धर्मेगौडा यांच्या मृतदेहाशेजारी सुसाईड नोटही सापडली आहे. यामध्ये काँग्रेस सदस्यांनी 15 डिसेंबर रोजी सभागृहात केलेल्या मारहाणीमुळे आपण दु:खी असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.
रेल्वे रुळाजवळ सापडला विधानपरिषद उपसभापतींचा मृतदेह
15 डिसेंबर रोजी काँग्रेस सदस्यांनी विधानपरिषदेत एस एल धर्मेगौडा यांना धक्काबुक्की केली होती. तसेच त्यांना खुर्चीवरुन ढकलले होते. या घटनेमुळे धर्मेगौडा अतिशय दु:खी होते. दरम्यान काँग्रेसचे सदस्य सभापतींच्या नियुक्तीचा विरोध करत होते. उपसभापती एस एल धर्मगौडा खुर्चीवर बसताच गोंधळ एवढा वाढला की काँग्रेस सदस्यांनी त्यांना खुर्चीवरुन ढकलले. यावेळी काँग्रेस आणि भाजप आमदारांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली.
चिकमंगळुरु जिल्ह्यातील गुनसागरच्या कडूर तालुक्यात त्यांनी रेल्वेसमोर उडी मारुन जीव दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. धर्मेगौडा सोमवारी (28 डिसेंबर) रात्री उशिरा आपल्या घरातून कारमधून निघाले होते. बराच वेळ होऊनही ते घर न परतल्याने पोलीस आणि त्यांचे कर्मचारी त्यांना शोधण्यास बाहेर पडले. त्यानंतर आज आज पहाटे रेल्वे रुळाजवळ त्यांचा मृतदेह सापडला. चिकमंगळुरुमधील सरपनहल्ली या मूळगावी धर्मेगौडा यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.