अखेर भारतातही दाखल झाला कोरोनाचा नवा स्ट्रेन


नवी दिल्ली – कोरोनाबाधितांच्या संख्येत कमी होत असतानाच ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे पुन्हा संपूर्ण जगाची डोकेदुखी वाढवली आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनाच्या या नवीन प्रकारानेही जगभरात हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. १६ देशात आतापर्यंत पोहोचलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन आता भारतातही दाखल झाला आहे. देशात कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे बाधित झालेले सहा रुग्ण आढळून आले आहेत.

कोरोनाचा नवा प्रकार ब्रिटनमध्ये आढळून आला आहे. भारतासह अनेक देशांनी या नव्या प्रकारच्या विषाणूला रोखण्यासाठी ब्रिटनमधून येणारी विमान थांबवली आहे. पण तरी देखील या नव्या कोरोनाने भारतात पाऊल ठेवले आहे. ब्रिटनमधून २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर दरम्यान ३३ हजार नागरिक भारतात परतले. या सर्व प्रवाशांचा शोध घेण्यात आला आणि चाचण्या करण्यात आल्या. यात ११४ प्रवासी कोरोनाबाधित आढळून आले. त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याचे नमुने देशातील १० प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले होते. यात कोलकाता, भुवनेश्वर, एनआयव्ही पुणे, सीसीएस पुणे, सीसीएमबी हैदराबाद, सीसीएफडी हैदराबाद, इन्स्टेम बंगळुरू, एनआयएमएचएएनएस बंगळुरू, आयजीआयबी दिल्ली आणि एनसीडीसी दिल्ली या प्रयोगशाळांमध्ये हे नमुने पाठवण्यात आले होते.

यात बंगळुरू येथील प्रयोगशाळेत पाठवलेल्या नमुन्यापैकी तीन रुग्णांमध्ये नवीन स्ट्रेन आढळून आला आहे. तर हैदराबाद प्रयोगशाळेतील दोघांच्या शरीरात आणि पुण्यातील प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आलेल्या नमुन्यांपैकी एका नमुन्यात हा स्ट्रेन आढळला आहे. कोरोनाचा नवा प्रकार एकूण सहा रुग्णांच्या शरीरात आढळून आला आहे. या सर्व रुग्णांना संबंधित राज्यांनी स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवले आहे. तर त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्याचबरोबर अन्य प्रवाशांची माहिती घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

ब्रिटनमध्ये काही महिन्यापूर्वी कोरोनाचा नवा प्रकार आढळून आला होता. या प्रकाराचा प्रसाराचा वेग प्रचंड असल्याचे ब्रिटन सरकारने म्हटल्यामुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक पुन्हा बंद करण्यात आली आहे. पण कोरोनाचा हा प्रकार १६ देशात पोहोचला आहे. भारतातही कोरोनाच्या नवीन स्ट्रेनचे रुग्ण आढळून आले असून, या यादीत भारताचाही समावेश झाला आहे.