26 जानेवारीपूर्वी मुंबईतील शाळा सुरु होण्याची शक्यता


मुंबई : कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण, आता टप्प्याटप्प्याने बहुतांश शाळा सुरु करण्यात येत आहेत. आता 26 जानेवारी 2021 पूर्वी मुंबईतही शाळा सुरु होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पालिका शिक्षण विभागाने आयुक्तांकडे शाळा सुरु करण्यासंबंधीचा प्रस्ताव सादर केला आहे. ज्यावर मंगळवारी निर्णय होऊ शकतो. मागील काही दिवसांपासून कमी होणारी रुग्णसंख्या आणि नव्याने सापडणाऱ्या रुग्णांचे लक्षणीयरित्या कमी होण्याचे प्रमाण पाहता यासंदर्भातील निर्णय घेतला जाऊ शकतो. दरम्यान, कोरोना काहीसा नियंत्रणात येत असल्याचे पाहता मुंबई, ठाणे आणि रायगडमधील शाळा येत्या काही दिवसांमध्ये सुरु होणार असल्याचे चित्र आहे.

मागील बऱ्याच दिवसांपासून सुरु असणाऱ्या चर्चा आणि बंद असणाऱ्या शाळा यावर आता तोडगा निघणार आहे. असंख्य पालक आणि विद्यार्थ्यांचे याच निर्णयाकडे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, 15 जानेवारीपर्यंत शाळा पुन्हा सुरु करण्यासाठी शिक्षण विभाग सज्ज असल्याची माहिती समोर येत आहे. असे असले तरीही अंतिम निर्णय पालिका आयुक्त घेणार आहेत.

मुंबई विभागातील शाळा 23 नोव्हेंबरलाच सुरु होणार होत्या. पण, कोरोनाची नोव्हेंबर महिन्यातच परिस्थिती पाहत हा निर्णय़ पुढे ढकलण्यात आला. तरीही काही जिल्ह्यांतील शाळा 4 जानेवारीपासून सुरु होणार आहे. शाळा सुरु होण्याच्या बाबतीतील निर्णय़ हा कोरोना रुग्णांची कमी होणारी संख्या आणि शिक्षण विभागाची तयारी यावर अवलंबून असणार आहे. त्या दृष्टीने सर्व सोईसुविधांची उपलब्धता लक्षात घेत यंत्रणा सज्ज असल्याचे लक्षात येत आहे.

मुंबईतील शाळा सुरु होण्यासाठी सकारात्मक चर्चा पाहायला मिळत असताना पुण्यात मात्र 4 जानेवारीला शाळा सुरु होणार की नाही, याबाबत संभ्रम कायम आहे. याबाबतचा निर्णय पालकांचे हमीपत्र आल्यानंतरच घेण्यात येणार असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.