टीआरपी वाढविण्यासाठी गोस्वामींनी दिली लाखोंची लाच: मुंबई पोलीस


मुंबई: आपल्या वाहिनीचा टेलिव्हिजन रेटींग पॉईंट अवाजवी प्रमाणात वाढवून दाखविण्यासाठी ‘रिपब्लिक टिव्ही’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी ‘बीएआरसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यासह अनेकांना लाखो रुपयांची लाच दिल्याचा आरोप मुंबई पोलिसांनी न्यायालयात केला.

टीआरपी घोटाळ्याचे दासगुप्ता हे मुख्य सूत्रधार आहेत. स्वतःच्या तुंबड्या भरून घेण्यासाठी अशा प्रकारचे आणखी किती गैरव्यवहार करण्यात आले आहेत याची चौकशी करायची आहे. त्यासाठी दासगुप्ता यांच्यासह अटक करण्यात आलेल्या १५ जणांची पोलीस कोठडी वाढवून देण्यात यावी, अशी मागणी पोलिसांनी केली. दासगुप्ता यांना एक आठवड्यापूर्वी अटक करण्यात आली आहे.

गोस्वामी यांनी दासगुप्ता यांच्यासह ‘बीएआरसी’च्या अनेक उच्च पदस्थांना मोठ्या रकमेची लाच दिली. त्यामध्ये ‘बीएआरसी’चे सीओओ रोमिल रामगढीया यांचाही समावेश आहे. रामगढीया यांनी ‘रिपब्लिक टिव्ही’ची दर्शकसंख्या अयोग्य रीतीने वाढवून दाखविण्यासाठी गुप्त माहिती उघड केली आहे, असे पोलिसांच्या अर्जात नमूद करण्यात आले आहे. रिपब्लिक टिव्ही आणि रिपब्लिक भारत या वाहिन्यांची खोटी दर्शकसंख्या नोंदविण्यासाठी आपल्या पदाचा केला. त्यासाठी त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्या कटात सहभाग घेतला असा आरोप पोलिसांनी केला आहे.