भाजप सरकार गेल्यानंतरच वाचेल देशातील लोकशाही: अखिलेश यादव


लखनौ: केंद्रातील भारतीय जनता पक्ष सत्तेवरून गेल्यानंतरच देशातील लोकशाही वाचेल, असे मत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी व्यक्त केले. राज्यात सन २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत आपला पक्षच सत्तेवर येईल, असा दावाही त्यांनी केला.

भाजप सरकारने अन्याय आणि अत्याचार यांची सीमा ओलांडली आहे. जो कोणी सरकारच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो, त्याचा आवाज दडपण्याचा काम हे सरकार करत आहे. या सरकारची गच्छंती झाल्याखेरीज देशात पुन्हा लोकशाही प्रस्थापित होणार नाही, असा इशारा त्यांनी पक्षाच्या मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना दिला.

यापूर्वी ट्विट करून यादव यांनी केंद्र सरकारवर टीकेचा भडीमार केला. केंद्र सरकार शेतकरी विरोधी आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी चर्चेसाठी दिलेली तारीख पुढे ढकलून त्यांनी कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांशी आपल्याला काही देणेघेणे नाही हे दाखवून दिले आहे, असा आरोप त्यांनी केला. सरकार शेतकऱ्यांशी छल-कपट करत आहे. इतका खोटेपणा आणि भ्रष्टाचार या अशी कोणत्याही सरकारने केलेला नाही. हे सरकार कोणाचेही काहीही करू शकते, अशी टीका करतानाच या सरकारला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.