पुण्यात अॅमेझॉन कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी मनसेच्या ८ कार्यकर्त्यांना अटक


पुणे: मराठी भाषेला अॅमेझॉनच्या वेबसाइटवर प्राधान्य देण्यात यावे, यासाठी आक्रमक झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील कोंढव्यात अॅमेझॉनच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. पोलिसांनी या प्रकरणी मनसेच्या आठ कार्यकर्त्यांना अटक केली असून त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मराठी भाषेला अॅमेझॉनच्या वेबसाइटवर स्थान दिले जावे, अशी मागणी मनसेने केली होती. अॅमेझॉनकडून मनसेच्या मागणीकडे सुरुवातीला दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे मनसे आक्रमक झाली. मुंबईत देखील मनसे कार्यकर्त्यांनी अॅमेझॉनविरोधात आक्रमक होत, जाहिरातीचे फलक झळकवले होते. तर काही ठिकाणी फलक उतरवण्यात आले आणि हे प्रकरण न्यायालयात गेले होते. मुंबईतील दिंडोशी कोर्टाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीसही बजावली होती. त्यानंतर मनसे अधिकच आक्रमक झाली होती.

‘मराठी नाही तर अॅमेझॉन नाही’ ही मोहीम मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुरूच ठेवली. चार दिवसांपूर्वी पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी कोंढव्यातील अॅमेझॉनच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. या प्रकरणात मनसेच्या आठ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.