पवारांनाही ‘संपुआ’चे अध्यक्षपद नको असेल: पी चिदंबरम यांचा दावा


नवी दिल्ली: संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्षपद म्हणजे पंतप्रधानपद नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही आघाडीच्या अध्यक्षपदी येण्यात रस असेल असे आपल्याला वाटत नाही, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी व्यक्त केले.

मागील काही काळापासून पवार यांना संपुआचे अध्यक्षपद दिले जाणार असल्याच्या चर्चा झडत आहेत. पवार आणि काँग्रेस यांनी या शक्यतेचा इन्कार केला असला तरीही ही चर्चा थांबलेली नाही. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादीचा सहयोगी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या मुखपत्रातही पवारांना अध्यक्ष करण्याची मागणी करून या चर्चेला हवा दिली आहे.

चिदंबरम यांनी मात्र या शक्यतेचा इन्कार केला. इथे आघाडीचा अध्यक्ष निवडायचा आहे. पंतप्रधान नाही. आघाडीमध्ये एकूण ९ ते १० पक्षांचा सहभाग आहे. त्यामध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. लोकसभा आणि राज्यसभा असे दोन्ही मिळून आमचे सुमारे १०० खासदार आहेत. स्वाभाविकपणे आघाडीचे नेतृत्व काँग्रेसकडे असेल आणि काँग्रेसचा नेता हाच आघाडीचा अध्यक्ष असेल, असा दावा त्यांनी केला.

संपुआतील घटक पक्ष आणि आघाडीचे सहयोगी पक्ष यांनी एकत्र राहून काम करणे आवश्यक आहे. त्यामुळेच आघाडीला देशभरात विस्तारण्यासाठी बळ मिळणार आहे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.