रॉयल एनफिल्डच्या ‘या’ चार नवीन गाड्या नवीन वर्षात होणार लाँच


नवी दिल्ली : देशभरात लोकप्रिय असलेल्या रॉयल एन्फिल्डच्या विविध गाडयांना तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात मोठी मागणी आहे. बुलेट नावाने या कंपनीच्या अनेक गाड्या प्रसिद्ध असून पुढील वर्षी नवीन गाड्या कंपनी लाँच करणार आहे. रॉयल एन्फिल्ड 2021 मध्ये चार नवीन गाड्या लाँच करणार असून या गाड्या कंपनीला जागतिक बाजारपेठेत आणखी पसरण्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत. दर तिमाहीला या गाड्या कंपनी लाँच करणार आहे.

NEW-GEN रॉयल एनफील्ड क्लासिक 350 – ही गाडी सध्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. पण या गाडीचे नवीन व्हर्जन आगामी वर्षात लाँच करण्यात येणार असून यात 349cc चे सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात येणार आहे. ही गाडी वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये लाँच केली जाणार असून यात straight-line stability मिळणार असून यामुळे विना अडथळा गाडी चालवण्यास चालकांना मदत मिळणार आहे. ‘J’ architecture या फ्लॅटफॉर्मच्या धर्तीवर कंपनीने ही गाडी तयार केली आहे. या गाडीच्या डिझाईनमध्ये काही बदल केले जाणार की याच गाडीला मॉडिफाय केले जाणार याकडे तरुणाईचे खास लक्ष असणार आहे.

ROYAL ENFIELD INTERCEPTOR 350 – ही गाडी देखील 349cc असून यात जुन्या गाडीच्या तुलनेत थोडेफार बदल करण्यात येणार आहे. या गाडीचे टेस्टिंग चेन्नईमध्ये सुरु असून या गाडीच्या इंजिनमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत. ट्विन एग्जॉस्ट सिस्टम यात नसून सिंगल साइड-माउंटेड एग्जॉस्ट यूनिट देण्यात येणार आहे. या गाडीच्या डिझाईनमध्ये बदल करण्यात आले असून या गाडीत Meteor 350 ची देखील झलक पाहायला मिळणार आहे.

ROYAL ENFIELD 650 CRUISER – भारतीय चाहत्यांना मागील काही काळापासून या गाडीची प्रतीक्षा आहे. इटलीतील EICMA Motor Show मध्ये 2019 साली याची पहिली झलक दाखवण्यात आली होती. सर्क्युलर हेड लॅम्प, सिलिंडर आकाराचा फ्युल टॅंक आणि फिनिश्ड अलॉय व्हील्स या गाडीत मिळणार आहेत. त्याशिवाय याचं इंजिन 650cc चे असून RE 650 twins च्या धर्तीवर याचे डिझाईन केले आहे. त्यामुळे पुढील वर्षी जूनमध्ये ही गाडी लाँच झाल्यानंतर याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

UPDATED ROYAL ENFIELD HIMALAYAN – हिमालयन या गाडीचा रॉयल एन्फिल्डच्या सर्वात जास्त विक्री होणाऱ्या गाड्यांमध्ये समावेश आहे. ही गाडी तरुणांमध्ये सर्वात लोकप्रिय असून या गाडीचे नवीन व्हर्जन 2021 मध्ये येणार आहे. या गाडीमध्ये विविध फीचर्स मिळणार असून यात ट्रिपल नेव्हिगेशन सिस्टीम आणि यूएसबी चार्जिंगची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे लॉन्ग ड्राइव्हमध्ये याची मोठी मदत होणार आहे. या गाडीत 411cc चे सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात येणार आहे. ही गाडी बर्फाळ प्रदेशामध्ये तसेच डोंगराळ प्रदेशात देखील अतिशय उत्तम चालते. यामुळे लॉन्ग ड्राइव्हसाठी ही गाडी खूपच फायदेशीर आहे.