पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून विधानसभेत जाऊ शकतात पार्थ पवार


पंढरपूर: पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यु झाल्यानंतर राष्ट्रवादीकडून त्यांच्या जागी कुणाला संधी मिळणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली असतानाच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना पोटनिवडणुकीत संधी मिळावी अशी मागणी होऊ लागली आहे. ही मागणी माजी आमदार औदुंबर अण्णा पाटील यांचे नातू अमरजित पाटील यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना अमरजित पाटील यांनी तसे पत्र लिहिले आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भावनेचे नाही तर विकासाचे राजकारण व्हायला हवे. पंढरपूरमध्ये पार्थ पवार आले तर रखडलेला विकास लवकर होईल, त्यामुळे पार्थ यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी अमरजित पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याबाबत तरुणाईचा विरोध असल्याचे बोलले जात असल्यामुळे लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकाराव्या लागलेल्या पार्थ पवार यांचे पुनर्वसन केले जाणार की, भारत भालके यांच्या मुलाला उमेदवारी मिळणार हे आगामी काही दिवसातच स्पष्ट होईल.