नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांचे देशवासीयांना आवाहन


नवी दिल्ली – मन की बात कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला. देशभरातून नागरिकांनी पाठवलेल्या पत्रांचा उल्लेख करत मोदी यांनी जनता कर्फ्यू, कोरोना, आत्मनिर्भर भारत, व्होकल फॉर लोकल यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. त्याचबरोबर भारतात तयार होणाऱ्या वस्तू जागतिक दर्जाच्या असाव्यात, असे सांगत उद्योगपतींनी यासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधानांनी यावेळी देशवासीयांना नव्या वर्षानिमित्त संकल्प करण्याचे आवाहन केले आहे.

पंतप्रधान मोदी वर्षाच्या शेवटच्या मन की बात कार्यक्रमात म्हणाले, अनेक नागरिकांनी मला पत्र पाठवली आहेत. यात अनेकांनी देशाचे सामर्थ्य, देशाच्या एकजुटीचे कौतूक केले आहे. पूर्ण जगाला प्रेरणा देणारा जनता कर्फ्यूसारखा अभिनव प्रयोग ठरला. संपूर्ण देशाने टाळ्या आणि थाळ्या वाजवून कोरोना योद्ध्यांचा सन्मान केला. एकजुट दाखवली. हे सुद्धा अनेकांनी लक्षात ठेवले असल्याचे मोदी म्हणाले.

आत्मनिर्भर भारताचा उल्लेख पंतप्रधान मोदींनी करत ‘व्होकल फॉर लोकल’वर जोर दिला. मोदी म्हणाले, देशातील नागरिकांनी व्होकल फॉर लोकलची भावना दृढ करण्याची गरज आहे. आपल्याला हे वाढवत राहायचे आहे. नव्या वर्षात प्रत्येकजण काही संकल्प करतो. यावेळी देशासाठी हा एक संकल्प आवश्यक करावा. आधीही मी बोललो आहे. मी पुन्हा एकदा आग्रह करतो की, आपण एक यादी बनवावी. ज्या गोष्टी दिवसभर आपण घेतो. त्यामध्ये नकळतपणे विदेशात तयार होणाऱ्या वस्तू तर घेत नाही ना? यासाठी त्या वस्तूची भारतात तयार झालेल्या पर्यायी वस्तूची माहिती घ्या. ती वस्तू भारतात तयार होईल, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी मोदी यांनी केले.

सामान्य माणसांमध्ये देशाच्या सन्मानार्थ झालेले बदल आपण अनुभवले आहेत. देशात आशेचा एक अद्भुत प्रवाहही मी बघितला आहे. असंख्य आव्हाने होती, संकटे देखील आली. जगभरात कोरोनामुळे पुरवठा साखळीत अनेक समस्या आल्या. पण प्रत्येक संकटात भारताने नवीन गोष्टी आत्मसात केल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.