कोरोनापेक्षा गंभीर समस्यांसाठी तयार राहा – जागतिक आरोग्य संघटना प्रमुखांचा इशारा!


मुंबई : 2020 या वर्षात संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसमुळे फटका बसला. या संसर्गजन्य आजाराच्या तडाख्यातून एकही देश बचावला नाही. वर्षातील बराच काळ लॉकडाऊनमध्ये घालवल्यानंतरही या महामारीतून जगाची सुटका झालेली नाही. त्यातच ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार समोर आल्यामुळे सर्वांची धास्ती आणखी वाढली आहे.

त्यातच आता जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधनोम घेब्रेसियस यांनी संपूर्ण जगाला वेठीस धरणारी कोरोना व्हायरस ही जगातील अंतिम महामारी नसल्याचा इशारा दिला आहे. हवामानातील बदल आणि पशू कल्याणाच्या समस्यांवर उत्तर शोधल्याशिवाय सर्व प्रयत्न व्यर्थ असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

टेड्रोस यांचा व्हिडीओ आंतरराष्ट्रीय महामारी दिवसाच्या तयारीच्या निमित्ताने जारी करण्यात आला. त्यांनी या व्हिडीओमध्ये वाट्टेल तितका पैसा खर्च करुनही पुढील महामारीचा सामना करण्याची तयारी न करणाऱ्या देशांवर टीका केली आहे. कोरोनाने शिकवलेला धडा जगाने आत्मसात करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

एका समस्येचे उत्तर शोधण्यासाठी आपण पैसा खर्च करतो, ती समस्या सुटल्यानंतर त्या समस्येचा सर्वांना विसर पडतो. आपण पुढची समस्या निर्माण होऊ नये म्हणून काहीही करत नाही. हे खूप धोकादायक आणि समजण्याच्या पलिकडचे असल्याची टीका त्यांनी केली.

आरोग्य विषयक पहिला वार्षिक जागतिक रिपोर्ट सप्टेंबर 2019 मध्ये प्रकाशित करण्यात आला होता. या रिपोर्टनंतर काही महिन्यातच जगभर कोरोना व्हायरसचा फैलाव झाला. संभाव्य विनाशकारी महामारीचा सामना करण्यासाठी जग तयार नाही. त्याचबरोबर ही जगातील शेवटची महामारी नसल्याचा इतिहास सांगतो, असे या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आले होते, याची आठवणही जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी यावेळी करुन दिली.

या महामारीने मनुष्य, हवामान आणि अन्य प्राणी यांच्यातील परस्पर संबंधावर प्रकाश टाकला आहे. मानवी आरोग्य चांगले करण्याच्या प्रयत्नांकडे आजवर दुर्लक्ष करण्यात आले. मनुष्य आणि प्राण्यांमधील परस्पर वातावरण आणि हवामान बदलाची समस्या यामुळे जगाला अजूनही धोका असल्याचे भाकीत त्यांनी व्यक्त केले आहे.