कर्णधार अजिंक्य रहाणेची शतकी खेळी, भारताचे सामन्यावर वर्चस्व


मेलबर्न – भारताने मेलबर्न कसोटी सामन्यावर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अष्टपैलू रविंद्र जाडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर आपले वर्चस्व निर्माण केले आहे. भारतीय संघ दुसऱ्या दिवसाअखेरीस ५ गडी बाद २७७ धावांपर्यंत मजल मारु शकला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा अजिंक्य रहाणेने नेटाने सामना करत नाबाद अर्धशतक झळकावले. दिवसाअखेरीस अजिंक्य १०४ तर जाडेजा ४० धावांवर खेळत होता. दुसऱ्या दिवसाअखेरीस भारताकडे ८२ धावांची आघाडी आहे.

पहिल्या दिवशी एक गडी गमावत ३६ धावांपर्यंत मजल मारल्यानंतर भारताची सुरुवात दुसऱ्या डावात काहीशी संमिश्र झाली. शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा झटपट माघारी परतल्यानंतर हनुमा विहारीच्या साथीने अजिंक्य रहाणेने संघाची पडझड थांबवत पहिले सत्र खेळून काढले. रहाणे-विहारी जोडीने दुसऱ्या सत्रातही संयमी फलंदाजी करत अर्धशतकी भागीदारी केली. पण या भागीदारीत धावा जमवणे भारतीय फलंदाजांना जमले नाही. हनुमा विहारी बाद झाल्यानंतर ऋषभ पंतने मैदानात येऊन फटकेबाजीला सुरुवात केली.

पंतला फटकेबाजी करताना पाहून अजिंक्यनेही मग आपल्या ठेवणीतले काही फटके लगावायला सुरुवात केली. मैदानावर पाय स्थिरावलेल्या अजिंक्यने मग ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. अजिंक्यने मध्यंतरीच्या काळात आपल्याला मिळालेल्या दोन जिवदानांचा फायदा घेत कसोटी क्रिकेटमधील आपले बारावे शतक झळकावले. पंत माघारी परतल्यानंतर अजिंक्यने पुन्हा एकदा रविंद्र जाडेजासोबत शतकी भागीदारी रचत भारतीय डावाला आकार दिला. दुसऱ्या दिवशी अखेरच्या सत्रात ढगाळ वातावरणामुळे सामना थांबवण्यात आल्यामुळे तिसऱ्या दिवशी भारतीय संघ आपली ८२ धावांची आघाडी किती वाढवू शकतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.