मुंबई – अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार साखरसम्राट रत्नाकर गुट्टे यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. रत्नाकर गुट्टे यांची २५५ कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. ही कारवाई ६३५ कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी करण्यात आल्याची माहिती ईडीने दिली आहे.
ईडीने जप्त केली साखरसम्राट रत्नाकर गुट्टेंवर यांची २५५ कोटींची मालमत्ता
मनी लॉण्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत ईडीने कारवाई करत गंगाखेड शुगर अॅण्ड एनर्जी लिमिटेड, योगेश्वरी हॅचरीज आणि गंगाखेड सोलार पॉवर लिमिटेडमधील संपत्तीवर कारवाई केली आहे. रत्नाकर गुट्टे यांच्या मालकीची शुगर अॅण्ड एनर्जी लिमिटेड आहे. कंपनीचे ते संचालकही आहेत.
इतरांच्या मदतीने गरीब शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या कृषी कर्ज योजनेचा रत्नाकर गुट्टे यांनी गैरफायदा घेतल्याचा ईडीचा आरोप आहे. ऊस शेतकऱ्यांना (जमिनीच्या आधारे) या कर्ज योजनेअंतर्गत बँका पीकांसाठी महत्वाच्या गोष्टी उदाहरणार्थ बियाणे, खते, ट्रॅक्टर, पंप आणि इतर गोष्टी खरेदी करण्यासाठी पैसा देते.
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, रत्नाकर गुट्टे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पीक खरेदी करताना शेतकऱ्यांची माहिती घेत एक डेटा बँक तयार केल्यानंतर गंगाखेड साखर कारखाना शेतकऱ्यांसाठी कृषी कर्ज मिळवण्याच्या उद्देशाने काही बँकांशी जोडला गेला. थोडक्यात बँकांसाठी ते एजंट झाले आणि शेतकऱ्यांच्या माहितीची पडताळणी करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आली.
कारवाईबाबत माहिती देताना ईडीने सांगितले की, गंगाखेड साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या उपलब्ध माहितीचा गैरफायदा घेत त्यांच्या नावे कर्ज घेतले. बँकांनी २०१२.१३ ते २०१६-१७ दरम्यान जवळपास ७७२ कोटींचे कर्ज मंजूर केले आणि ६३२ कोटींची वाटप केले. हे पैसे लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत कधी पोहोचलेच नाहीत. दुसरीकडे गंगाखेड साखर कारखान्याने शेतकऱ्यांकडून मिळालेल्या स्वाक्षरीचा फायदा घेत हे पैसे वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये टाकले. कंपनीने हा पैसे जमीन तसेच शेअर्स खरेदी करण्यासाठी आणि कर्ज फेडण्यासाठी वापरल्याचे तपासात समोर आले.