‘नाइट कर्फ्यु’दरम्यान गाडी चालवताना दिसल्यास जप्त होणार गाडी


मुंबई – ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे राज्यात सर्वत्र खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यापार्श्वभूमीवर राज्यात मुंबईसह सर्व महापालिका क्षेत्रांमध्ये मंगळवारपासून ५ जानेवारीपर्यंत रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुंबई पोलिसही संचारबंदीच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी सज्ज आहेत. मुंबई पोलिसांकडून रात्री एखादी व्यक्ती विनाकारण वाहन फिरवताना आढळल्यास त्या व्यक्तीचे वाहन जप्त केले जाणार आहे.

रस्त्यावर रात्री ११ ते सकाळी सहा यादरम्यान कोणी गाडीवर फिरताना दिसल्यास त्या व्यक्तीची गाडी जप्त केली जाईल . पण ही कारवाई अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांवर होणार नसल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. रात्रीच्या संचारबंदी आदेशाचे कठोर पालन केले जाईल. पोलिसांची गस्त रात्रीच्या वेळी वाढवली जाईल. नाकाबंदीमध्येही वाढ केली जाईल. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वगळता रात्री ११ ते पहाटे ६ यादरम्यान रस्त्यावर कोणी गाडीवर फिरताना दिसल्यास त्याची गाडी जप्त केली जाईल. त्याचबरोबर मुंबई पोलीस उपायुक्त एस. चैतन्य यांनी नागरिकांना रात्री रस्त्यावर येऊ नये आणि घरातूनच नववर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन केले आहे.

दरम्यान, मंगळवारी रात्रीपासून ५ जानेवारीपर्यंत राज्यातील महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू राहील. संचारबंदीच्या निर्णयामुळे सरत्या वर्षांला निरोप आणि नववर्षांच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री होणाऱ्या जल्लोषावर पूर्णपणे निर्बंध आले आहेत. त्याचबरोबर नाताळच्या उत्साहावरही विरजण पडणार आहे.