मुंबईतील वेळा आणि प्रोटोकॉलची माहिती नव्हती; अटकेनंतर सुरेश रैनाची प्रतिक्रिया


मुंबई – मुंबई पोलिसांनी भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सुरेश रैना याच्यावर कारवाई केली असून अटकेनंतर त्याची जामीनावर सुटका केली. ड्रॅगनफ्लाय नाईट क्लबवर सहार पोलिसांनी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास धाड टाकून कारवाई केली असता सुरेश रैनादेखील तिथे उपस्थित होता. पोलिसांनी या दरम्यान कारवाई करत ३४ जणांना अटक केली होती. सुरेश रैनाचासहीत अनेक सेलिब्रेटींचाही यामध्ये समावेश होता. दरम्यान पोलिसांच्या कारवाईवर सुरेश रैनाने प्रतिक्रिया दिली आहे.

यासंदर्भात सुरेश रैनाच्या मॅनेजमेंट टीमकडून निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यांनी यामध्ये सुरेश रैना एका शूटसाठी मुंबईत असल्याची माहिती दिली आहे. डिनरसाठी एका मित्राने बोलावल्यामुळे सुरेश रैना तिथे गेला होता. स्थानिक वेळा आणि प्रोटोकॉलची त्याला माहिती नव्हती नसल्याचेही त्याच्या टीमने सांगितले आहे.

एका शूटसाठी सुरेश रैना मुंबईत होता, ज्याची वेळनंतर पुढे वाढली. रात्रीच्या विमानाने सुऱेश रैना दिल्लीला निघणार होता त्यापूर्वी त्याला मित्राने डिनरसाठी बोलावले होते. स्थानिक वेळा आणि प्रोटोकॉलची त्याला माहिती नव्हती. माहिती मिळाल्यानंतर त्याने लगेचच त्याची काळजी घेतली. दुर्दैवी घटनेबद्दल त्याने खेद व्यक्त केला आहे. सुरेश रैना नेहमीच प्रशासनाकडून आखून दिलेल्या नियमांचे पालन करत असून भविष्यातही करत राहील, असे त्याच्या टीमकडून सांगण्यात आले आहे.