नव्या कोरोनाला रोखणारी लस सहा आठवड्यात बनवू: ‘बायोएनटेक’चा दावा


बर्लिन: नवा कोरोना विषाणू ब्रिटनमध्ये आढळल्यानंतर जगभर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिक वेगाने पसरणारा कोरोना विषाणू नियंत्रित करण्यासाठी सध्या विकसित करण्यात आलेल्या लसींचा उपयोग होणार का, याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे. मात्र, ‘बायो एनटेक’ या लस उत्पादक कंपनीने बदलत्या स्वरूपाच्या विषाणूला प्रतिबंध करणारी लस सहा आठवड्यात बनविण्याचा दावा केला आहे.

सध्याच्या विषाणूंवर आपण लस विकसित केली आहे. नव्या विषाणूंवर मात करणारी लस उत्पादित करण्यावर त्वरित काम सुरू करून आपण सहा आठवड्यात नवी लस उपलब्ध करू शकू, असा विश्वास कंपनीचे सहसंस्थापक उमर साहिन यांनी व्यक्त केला.

ब्रिटनमध्ये आढळलेल्या विषाणूमध्ये एकूण ९ बदल (म्युटेशन) झाले आहेत. सर्वसाधारणपणे विषाणूमध्ये एकच बदल होतो, असे साहिन यांनी सांगितले. कंपनीने फायझरच्या साथीने बनविलेली लस या नव्या विषाणूसाठीही ठरेल, असा दावाही त्यांनी केला. सध्याच्या विषाणूमध्ये १ हजाराहून अधिक अमिनो ऍसिड आहेत. त्यापैकी केवळ ९ मध्ये बदल झाला आहे. याचा अर्थ ९९ टक्के प्रथिने तीच आहेत. नव्या विषाणूवर संशोधन सुरू करण्यात आले असून एका आठवड्यात काही निष्कर्ष हाती येतील. संशोधन आणि चाचण्यांनंतर याबद्दल ठोस दावे करू, असे साहिन यांनी सांगितले.