कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर केंद्राने जारी केली नवी नियमावली


नवी दिल्ली – युकेमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेननंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशातील नागरिकांसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नव्या नियमावलीनुसार, यूकेहून येणाऱ्या प्रवाशांपैंकी नव्या कोरोना स्ट्रेनसहीत संक्रमित आढळलेल्या रुग्णांना वेगळ्या आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर इन्स्टिट्युशनल क्वारंटीनमध्ये कोरोना संक्रमित आढळलेल्या सह-प्रवाशांना ठेवण्यात येईल. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता केंद्र सरकारने युकेहून येणाऱ्या विमानांसाठी नवी एसओपी जाहीर केली आहे.

  • आरटी-पीसीआर चाचणी ब्रिटनहून येणाऱ्या सर्व प्रवाशांना विमानतळावरच करणे अनिवार्य आहे. कोरोना संक्रमित या टेस्टमध्ये आढळलेल्या रुग्णांना एका वेगळ्या आयसोलेशन युनिटमध्ये इन्स्टिट्युशन क्वारंटीनमध्ये ठेवण्यात येईल. ‘जिनोमिक सिक्वेंसींग’साठी पुण्याच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी’ला पॉझिटिव्ह आढलेल्या रुग्णांचे नमुने पाठविण्यात येतील.
  • नवा विषाणू कोरोना संक्रमित आढळलेल्या व्यक्तीमध्ये न आढळळ्यास त्याच्यावर सध्याच्या सुरू असलेल्या प्रोटोकॉलनुसार उपचार करण्यात येतील. परंतु, त्या रुग्णावर ‘जिनोमिक सीक्वेन्सिंग’मध्ये नवा विषाणू आढळल्यास उपचार सध्याच्या प्रोटोकॉलनुसार झाल्यानंतर १४ दिवसानंतर पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात येईल. तो १४ व्या दिवशीही पॉझिटिव्ह आढळला तर त्याच्या चाचण्या तोपर्यंत सुरू राहतील, जोपर्यंत सलग दोन वेळा त्याच्या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह येणार नाही.
  • आरटी-पीसीआर चाचणीत निगेटिव्ह आढळणाऱ्या प्रवाशांना घरी क्वारंटीन राहण्याचा सल्ला दिला जाईल.
  • या सगळ्या गाईडलाईन्स चेक इन करण्यापूर्वीच प्रवाशांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी विमान कंपनीची असेल. उड्डाणादरम्यान याची अनाउन्समेंट केली जाईल. ही मार्गदर्शक तत्त्वे आगमन-प्रतीक्षा भागात चिकटवली जातील.
  • ब्रिटनहून २१ ते २३ डिसेंबर दरम्यान येणाऱ्या आणि आरटी-पीसीआर चाचणीत पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना एका वेगळ्या क्वारंटीन सेंटरमध्ये इन्स्टीट्युशनल क्वारंटीन केले जावे. तसेच त्यांची आयसीएमआर मार्गदर्शक सूचनांनुसार तपासणी केली जावी.
  • अशावेळी संक्रमित व्यक्तीच्या सीटलाईनमधल्या तीन सीट पुढे आणि तीन सीट मागे ज्या व्यक्ती बसलेल्या असतील त्यांना संपर्कात आलेल्या व्यक्ती म्हणून त्यांची गणती केली जाईल. त्याचबरोबर यात प्रवाशांच्या संपर्कात येणाऱ्या केबिन क्रूची देखील ओळख पटवली जाईल.
  • ब्रिटनहून २१ ते २३ डिसेंबर दरम्यान आलेल्या आणि आरटी-पीसीआर चाचणीत निगेटिव्ह आढळलेल्या प्रवाशांची यादी राज्यांना सोपवली जाईल. त्यांना होम क्वारंटीन करण्यात येईल.
  • जे प्रवासी २५ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर दरम्यान ब्रिटनमधून येतील त्यांच्याशी डिस्ट्रिक्ट सर्व्हिलान्स अधिकारी संपर्क करतील तसेच अशा प्रवाशांना स्वत:च्या तब्येतीवर लक्ष ठेवावे लागेल. कोणतीही लक्षणे आढळल्यास या प्रवाशांची आरटी-पीसीआर टेस्ट केली जाईल. चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्यास नव्या कोरोना स्ट्रेनच्या तपासासाठी नमुन्यांची चाचणी केली जाईल.
  • डिस्ट्रिक्ट सर्व्हिलान्स अधिकाऱ्यांकडे ९ डिसेंबर ते २३ डिसेंबर दरम्यान येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठीची यादी सोपवली जाईल. या लोकांचा पुढचे १४ दिवस ते फॉलोअप घेतील.
  • पर्यवेक्षणाखाली असणार्‍या प्रवाशांच्या भारतातील एन्ट्रीच्या २८ दिवसांपर्यंत अधिकारी त्यांची माहिती घेत त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवतील.
  • यूकेमधून ९ डिसेंबर ते २३ डिसेंबरदरम्यान आलेल्या सर्वांना आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य असेल. विमानतळावर चाचणी निगेटिव्ह आली असेल किंवा त्याने आपल्यासोबत निगेटिव्ह चाचणी रिपोर्ट आणला असेल तरीही चाचणी करावी लागेल.
  • ज्या शहरात प्रवासी विमानाने उतरले, त्या शहरातून दुसऱ्या शहरात गेले असतील तर त्याची माहिती संबंधित जिल्हा अथवा राज्यांना दिली जाईल.
  • अशा प्रवाशांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्यांना स्वतंत्र आयसोलेशन सेंटरमध्ये इन्स्टिट्युशनल क्वारंटीनमध्ये ठेवण्यात येईल.
  • एखाद्या प्रवाशाबद्दल माहिती मिळाली नाही तर डिस्ट्रिक्ट सर्व्हिलान्स अधिकारी सेंट्रल सर्व्हिलान्स युनिटला याबद्दल माहिती देतील.