एकाच दिवसात दोन भारतीय अ‍ॅप्समध्ये गुगलची कोट्यवधींची गुंतवणूक


नवी दिल्ली – भारतातील शॉर्ट व्हिडिओ सेक्टरमध्येही दबदबा निर्माण करण्याच्या तयारीत टेलिकॉम सेक्टरमध्ये केलेल्या गुंतवणूकीनंतर आता दिग्गज टेक कंपनी गुगल असून एकाच दिवसात भारतातील दोन शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्ममध्ये कंपनीने गुंतवणूक केली आहे. ज्या दोन अ‍ॅप्समध्ये गुगलने गुंतवणूक केली त्यातील पहिले ग्लान्सचे Roposo अ‍ॅप आणि दुसरे डेलीहंटचे Josh अ‍ॅप यांचा समावेश आहे. या दोन्ही अ‍ॅप्सचे वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक भाषेत दोन्ही अ‍ॅप्सचा कंटेट मिळतो.

ग्लान्सकडे Roposoची मालकी असून भारतीय युनिकॉर्न inMobi ची ही सहायक कंपनी आहे. 33 मिलियन डेली एक्टिव्ह युजर आणि 115 मिलियन मंथली एक्टिव्ह युजर्स या अ‍ॅपकडे आहेत. यामध्ये गुगलने 145 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली आहे. कंपनी या गुंतवणूकीसोबतच ग्लान्स आणि रोपोसोमध्ये आपली AI क्षमता वाढवण्याची योजना आखत आहे. याशिवाय टेक्नोलॉजीची टीम मोठी करणे आणि आपल्या प्लॅटफॉर्मवर विविध प्रकारची सर्व्हिस देण्याची कंपनीची योजना आहे.

टीक-टॉकवर भारतात बंदी आणल्यानंतर डेलीहंटने शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म Josh ची सुरूवात केली. 12 स्थानिक भाषांमध्ये कंपनीचे हे अ‍ॅप उपलब्ध असून सध्या 36 मिलियन डेली एक्टिव्ह युजर्स आणि 77 दशलक्ष मंथली एक्टिव्ह युजर्स Josh अ‍ॅपकडे आहेत. यामध्ये 100 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे. डेलीहंटमध्ये गुगलशिवाय माइक्रोसॉफ्ट आणि अल्फावेव यांनीही मोठी गुंतवणूक केली आहे. दरम्यान, गुगलने भारतात 10 अब्ज डॉलर गुंतवणूक करण्याची घोषणा गुगल फॉर इंडिया इव्हेंटमध्ये केली होती. कंपनीने त्यातील 4.5 अब्ज डॉलर रिलायन्स जिओमध्ये यापूर्वीच गुंतवले होते.