LIC चा लोगो विनापरवानगी वापरल्यास होणार कठोर कारवाई


नवी दिल्ली : आपल्या कंपनीच्या लोगोबाबत देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा निगमने नागरिकांना सतर्क केले आहे. तुम्ही कंपनीच्या नोंदणीकृत ब्रॅण्डचे नाव किंवा लोगो जर विनापरवानगी वापरत असाल तर हा दंडनीय गुन्हा असणार आहे. तसे केल्यास तुमच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. याबाबतची माहिती LIC ने ट्विट करुन दिली आहे. LIC च्या लोगोचा वापर काही संशयित लोक सोशल मीडिया आणि डिजीटल मीडियावर विनापरवानगी करत असून हा दंडनीय गुन्हा असल्याचे एलआयसीने म्हटले आहे.

आम्ही ‘कॉपीराईट अ‍ॅक्ट 1957 अंतर्गत LIC लोगोचे अधिकृत मालक आहोत. त्यासोबतच आम्ही इतर प्लान, ब्रॉशर्स, जाहिराती आणि आमच्याद्वारे छापण्यात आलेले इतर गोष्टींचे मूळ साहित्यिक आणि कलात्मक कार्यांचे कॉपीराईटचे मालक आहोत. त्याशिवाय, आमचा डोमेन नेम www.licindia.in यावरही अधिकार असल्याचे ट्विट LIC ने केले आहे.

LIC लोगोचा विनापरवानगी वापर काही लोक विमा आणि विमा अ‍ॅडव्हायझरी सर्व्हिसेससारख्या कामांसाठी करत आहेत. लोकांमध्ये आणि पॉलिसीधारकांमध्ये यामुळे एलआयसीबाबत साशंकता निर्माण होत आहे. एकसारखे ट्रेड मार्क/सर्व्हिस मार्क किंवा डोमेनचे नाव वापरणाऱ्या लोकांबाबत कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा LIC ने दिला आहे.

अशा गोष्टींवर आळा घालण्यासाठी दोषींवर सिव्हील आणि क्रिमिनल अशा दोन्ही कारवाया केल्या जातील. आमच्या प्रोडक्टबाबत सर्व माहिती कंपनीच्या www.licindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्याशिवाय, आमच्या अधिकारीक वेबसाईटशिवाय डिजीटल मीडियावर उपलब्ध असलेल्या माहितीसाठी आम्ही जबाबदार नसल्याचेही LIC ने स्पष्ट केले आहे.