पं. नेहरूंमुळेच शेतकऱ्यांची ही अवस्था; मुकेश खन्ना


नवी दिल्ली – आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सुपरहिरो शक्तिमान फेम अभिनेता मुकेश खन्ना नेहमीच चर्चेत असतात. देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडींवर गेल्या काही काळात ते सातत्याने टीका करत आहेत. शेतकरी आंदोलनावर यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशात मागील ७० वर्षांपासून हेच सुरु आहे. नेहरूंनी त्यावेळी शहरीकरणाला महत्व दिले नसते तर देशाची आज ही अवस्था नसती, असा टोला त्यांनी लगावला आहे.

एका युट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून मुकेश खन्ना यांनी शेतकरी आंदोलनावर भाष्य केले. ते म्हणाले, मी भाजपला पाठिंबा देत आहे, असे लोकांना वाटते पण हे खोटे आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने मी कायम उभा आहे. देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हापासून आजतागायत शेतकऱ्यांच्या त्याच समस्या आहेत. शेतकऱ्यांची परिस्थिती मागील ७० वर्षात बदलली नाही. अन् याला जवाबदार आपल्या देशाचे धोरण आहे. देश ज्यावेळी स्वतंत्र झाला त्यावेळी जवाहरलाल नेहरूंनी शहरीकरणाला प्राधान्य दिले. त्यांनी त्याऐवजी खेड्यांना सक्षम केले असते, तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. खेडी आणि गावांनी देशातील ७५ टक्के भाग व्यापला आहे. आपण त्यांचा विकास करायला हवा. अशा आशयाची वक्तव्य या व्हिडीओमध्ये त्यांनी केली. सध्या त्यांचा हा व्हिडीओ चर्चेत आहे.