नाईट कर्फ्यूवर नाराज हॉटेल व्यावसायिक घेणार शरद पवारांची भेट


मुंबई: ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी राज्य सरकारने लागू केली आहे. हॉटेल व्यावयसायिकांनी राज्य सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारच्या निर्णयावर आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली. हॉटेल सुरु ठेवण्याची वेळ वाढवून द्यावी, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

5 जानेवारीपर्यंत रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हॉटेल व्यावसायिकांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. हॉटेल सुरु ठेवण्यासाठी 11 ची वेळ दीड वाजेपर्यंत वाढवून द्यावी,अशी मागणी करण्यात आली आहे. 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर हा व्यवसायाचा काळ असतो. या काळातच हॉटेल सुरु ठेवण्यास कमी वेळ मिळाला तर मोठे नुकसान होईल, असे आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी सांगितले. राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका यांच्या नियमावलीचे लॉकडाऊननंतर पालन करत हॉटेल व्यवसाय सुरू केले. पण, हॉटेल व्यावसायिकांचा व्यवसाय महापालिकेच्या आणि राज्य सरकारच्या आताच्या निर्णयाने ठप्प होईल. यामुळे हॉटेल व्यावसायिकांचे मोठे नुकसान होईल, अशी भीती शिवानंद शेट्टी यांनी व्यक्त केली.

राज्य सरकारच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे शिवानंद शेट्टी यांनी म्हटले. हॉटेल व्यवसाय बंद झाले तर सरकारचाही महसूल बुडणार आहे. हॉटेल व्यावसायिकांसाठी नियम शिथिल केले पाहिजे, ही मागणी हॉटेल व्यावसायिक करणार आहेत. शरद पवार यांची वेळ मागितली होती पण ते पुण्यात असल्यामुळे लवकरच त्यांची भेट घेऊन यासंदर्भात तोडगा काढावा म्हणून त्यांना सांगणार असल्याचे आहार संघटनेच्या शिवानंद शेट्टी यांनी सांगितले.