पवारसाहेब कधीही चुकीचा निर्णय घेणार नाहीत; मेट्रो प्रकल्पाचा चेंडू फडणवीसांनी टाकला शरद पवारांच्या कोर्टात


मुंबई – काल दुपारी 1 वाजता फेसबुक लाईव्हद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नियोजित वेळेनुसार महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. मेट्रो कारशेड आणि कांजूरमार्ग याबाबतही यावेळी सविस्तर भाष्य करताना विरोधकांना प्रत्युत्तर दिले. त्यानंतर, पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिप्रश्न केले आहेत. तसेच खासदार शरद पवार हे जर या विषयासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार असतील, तर त्यांचे स्वागतच आहे. कारण, पवारसाहेब प्रॅक्टीकल असून ते कधीही चुकीचा निर्णय घेणार करणार नसल्याचे म्हणत मेट्रो प्रकल्पाचा चेंडू फडणवीसांनी शरद पवारांच्या कोर्टात टाकला आहे.

मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावरुन राज्याचे होणारे नुकसान सांगत उद्धव ठाकरेंना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अहंकारी असे संबोधले होते. फेसबुक लाईव्हद्वारे फडणवीसांच्या अहंकारी टीकेला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिल्यानंतर, फडणवीस यांनी पुन्हा एकदा ही श्रेयवादाची लढाई नसून लोकांची दिशाभूल कशाला करता? असा सवाल उद्धव ठाकरेंना विचारला आहे. कारशेडसाठी भविष्यात कोणतीही अतिरिक्त जागा लागणार नसताना दिशाभूल कशाला? असा प्रश्न फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.

त्याचबरोबर 30 मिनिटांच्या संवादातून एक बाब प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे अजूनही आपण महाविकास आघाडी सरकारच्याच उच्चाधिकार समितीचा अहवाल पूर्णतः वाचलेला नाही. हा अहवाल एकदा सार्वजनिक करा. महाराष्ट्राच्या जनतेसमोर प्रत्यक्ष स्थिती, भूमिका, वास्तविकता येईल. या समितीनेच सांगितले की कांजूरमार्ग येथे कारशेड नेल्यास किती मोठे आर्थिक नुकसान होईल. शिवाय 4 वर्षांचा विलंब वेगळा. कांजूरमार्ग येथे कारशेड करायचे असेल तरीसुद्धा आरेमध्ये बांधकाम करावेच लागेल हे का लपवून ठेवता? असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

उच्चाधिकार समिती महाविकास आघाडी सरकारने स्थापन केली असून या मेट्रोचे 80 टक्के त्या समितीच्या अहवालानुसार काम झाले आहे. आरे शेडमध्ये जे मेट्रो स्टेशन करायचे आहे, त्याचही 100 कोटींपेक्षा जास्त काम झाले आहे. विशेष म्हणजे कांजूरमार्गच्या जागेचा उल्लेख करताना, आत्ता खर्चाचा बोजा पडेलच, शिवाय 2021 मध्ये होणारी मेट्रो 2024 सालापर्यंत मिळणार नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.

तसेच, हा प्रकल्प केवळ राज्य सरकारचा नसून या प्रकल्पासाठी केंद्राचाही 50 टक्के हातभार असल्यामुळे, हा विषय प्रतिष्ठेचा करण्यात काहीच अर्थ नाही. कारण, आरेत बांधकाम केल्याशिवाय कांजूरमार्गला मेट्रो करताच येणार नाही, हे सत्य आपण का लपवतो, असा सवालही फडणवीस यांनी विचारला आहे.

आम्ही या मेट्रो प्रकल्पात भावनिकदृष्ट्या जुडलेलो आहोत, मेट्रो होऊ नये, असे कोणाचेच मत नाही. मी स्वत: मेहनत करुन 80 टक्के टनलिंगचे काम त्या काळात पूर्ण केल्यामुळेच जर मोदींशी पवारसाहेब यासंदर्भात बोलून चर्चा करणार असतील, तर त्यांचे स्वागतच आहे. मोदींशी उद्धव ठाकरेंनीही चर्चा करावी. हे पहा, शरद पवार आणि आमचे कितीही वैचारिक मतभेद असले तरी, तो अहवाल पवारसाहेब जेव्हा वाचतील, तेव्हा ते प्रॅक्टीकल निर्णय घेतील, पवारसाहेब कधीही चुकीचा निर्णय घेणार नसल्याचा आशावाद फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.