मुंबई पोलिसांचे आवाहन; मागील काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल ‘या’ लिंकवर नका करू क्लिक


मुंबई – कोरोनामुळे देशातील बेरोजगारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे आता अनलॉकनंतर नोकरी शोधण्यासाठी अनेकजण शहरांकडे वळू लागले आहेत. पण याच बेरोजगारीच्या संकटाचा फायदा घेऊन काही जण व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून लोकांची खासगी माहिती चोरुन त्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करत असल्याचे प्रकार उघडकीस आलेत.

एकीकडे कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढत होत असतानाच दुसरीकडे सोशल मिडियावरील अफवांचे प्रमाणही मागील काही महिन्यांपासून वाढले आहे. सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून पोलिसांपासून सरकारी यंत्रणांपर्यंत आणि नोकरीपासून ते घर बसल्या पैसे कमवण्याच्या जाहिरातींपर्यंत अनेक विषयांसदर्भातील अफवा व्हायरल केल्या जात आहे. सध्या अशीच एक अफवा चर्चेत आहे, ती म्हणजे घरबसल्या मोबाईलचा वापर करुन दिवसाला काही हजार कमवा. पण अशा अफवांना लोकांनी बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

एक पार्ट टाइम नोकरी करण्याची संधी चालून आली आहे असा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. दिवसाला दोनशे ते तीन हजार रुपयांपर्यंत कमाई या माध्यमातून करता येईल. यासाठी दिवसातून केवळ १० ते ३० मिनिटे काम करावे लागेल. खालील लिंकवर क्लिक करुन नाव नोंदवा. नाव नोंदवल्यानंतर तुम्हाला ५० रुपये मिळतील, असे सांगून खाली एक लिंक देण्यात आली आहे.

पण हा फसवणुकीचा प्रकार असून याला नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. हा मेसेज म्हणजे फसवणुकीचा प्रकार असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमधील सायबर गुन्हे विभागाच्या पोलीस उपायुक्त (डीसीपी) रश्मी करंदीकर यांनी दिली. या लिंकवर नागरिकांनी क्लिक करु नये, असे आवाहनही करंदीकर यांनी नागरिकांना केले आहे.