कोरोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांचे महत्वपूर्ण वक्तव्य


नवी दिल्ली – जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात झालेली असतानाच कोरोनाचा एक नवीन प्रकार ब्रिटनमध्ये आढळून आला आहे. जगभरात हा कोरोनाचा नवीन प्रकार धुमाकूळ घालणाऱ्या आधीच्या प्रकारापेक्षा जास्त धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे. कोरोनाच्या या नव्या प्रकारची लागण होण्याची शक्यता अधिक असून हा नवीन प्रकार नियंत्रणाबाहेर असल्याचे ब्रिटनने म्हटल्यामुळे तिथे लॉकडाउन अधिक कडक करण्यात आला आहे.

जगातील अनेक देशांनी कोरोनाच्या या नव्या प्रकारच्या धोक्यामुळे आंतरराष्ट्रीय विमान सेवा आणि ब्रिटनहून येणाऱ्या प्रवाशांना प्रवेशबंदी केली आहे. सौदी अरेबिया, कॅनडा या देशांनी आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनमध्ये जाणाऱ्या आपल्या विमानसेवा नेदरलँड आणि बेल्जिअमने तात्पुरत्या स्थगित केल्या आहेत. इटलीदेखील विमानसेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याच्या विचारात आहे.

भारतातील काही नेत्यांनी या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करण्याची मागणी केली आहे. या नव्या प्रकारामुळे जगासोबतच भारताची देखील चिंता वाढवली आहे. कारण आधीच कोरोना व्हायरसमुळे मोठे नुकसान झाले आहे. या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी, सरकार सर्तक असून चिंता करण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे.