पृथ्वी शॉला बळीचा बकरा बनवू नका ! आकाश चोप्राचा टीम इंडियाला सल्ला


नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेतील पहिला सामना गमावणाऱ्या टीम इंडियासमोर बॉक्सिंग डे कसोटी सामन्याआधी संघनिवडीचा मोठा पेच निर्माण झाला आहे. दोन्ही डावातील सलामीवीर पृथ्वी शॉचा सुमार खेळ, विराटचे मायदेशी परतणे आणि त्याचबरोबर मोहम्मद शमीला झालेल्या दुखापतीमुळे भारतीय संघाच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. पृथ्वी शॉला दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात स्थान मिळणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. पण पृथ्वी शॉला भारतीय संघातील स्थान नाकारताना त्याला बळीचा बकरा बनवू नका, असे वक्तव्य भारतीय संघाचा माजी कसोटीपटू आकाश चोप्राने केले आहे.

भारतीय संघात पृथ्वी शॉला स्थान मिळणार नाही, हे जवळपास निश्चित झाले आहे. दोन्ही डावांत त्याची कामगिरी खराब झाली आहे, यात काही वादच नाही. पण दुसऱ्या कसोटीसाठी पृथ्वी शॉला डावलून शुभमन गिलला संधी देता येईल. यानंतर तिसऱ्या कसोटीसाठी रोहित शर्मा पुनरागमन करेल, मग त्यावेळी तुम्ही कोणाला संघाबाहेर बसवाल? शुभमन गिल आणि पृथ्वी शॉ यांच्यात जो कमी धावा करेल, त्याला तुम्हाला बाहेर बसवावे लागेल, हा संगीत खुर्चीचा खेळ तुम्ही किती वेळ खेळत बसणार आहात? एखाद्या खेळाडूला पुरेशी संधी मिळाली आहे आणि त्याला अजून संधी देता येणार नाही हे कसे ठरवणार? आपल्या यु-ट्यूब चॅनलच्या कार्यक्रमात आकाश चोप्रा बोलत होता.

संघ व्यवस्थापन पृथ्वी शॉला डावलू शकते, पण खेळभावना कायम राखायची असेल तर बळीचा बकरा शोधू नका. दोन्ही सलामीवीरांनी खराब खेळ केला आहे, त्यात तुम्ही एकाला सोडून एकाला डावलाल तर मग तुम्ही बळीचे बकरे शोधत असल्याचे वाटेल. पृथ्वीने इतरांच्या तुलनेत खराब कामगिरी केल्यामुळे त्याला संघातून डावलण्याचे समर्थन करता येईल. परंतू पहिल्या कसोटीतील पराभव ही सांघिक जबाबदारी असल्याचे आकाश चोप्राने म्हटले आहे.