भाजप आमदाराच्या लग्नात कोरोना संदर्भातील सर्व नियम धाब्यावर; बडे नेते विनामास्क


पुणे: राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात भलेही घट होत असली तरीही कोरोना धोका अद्याप कायम आहे. तरी देखील अनेक जण बेजबाबदारपणे वागत आहेत. त्याचबरोबर आपल्या स्वत:ला जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणवून घेणारे लोकप्रतिनिधीदेखील कोरोना नियमांची पायमल्ली करण्यात मागे नाहीत. भारतीय जनता पक्षाचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्या लग्न सोहळ्यात याचा प्रत्यय आला. सोशल डिस्टन्सिंगचा या समारंभात पूर्ण फज्जा उडाला. लग्नाला उपस्थित असलेल्या अनेक मोठ्या नेत्यांनी मास्कदेखील घातले नसल्याचे फोटोत दिसत आहे.

एकीकडे ‘दो गज की दुरी’ राखण्याचे आणि मास्क वापरण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना करत आहेत. पण पंतप्रधान मोदी देखील काही दिवसांपूर्वी मास्कशिवाय सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाल्यानंतर आता राज्यातील भाजप नेते लग्न समारंभात कोरोना नियमांचे उल्लंघन करताना दिसले. ५०० हून अधिक जणांची पुण्यात संपन्न झालेल्या राम सातपुतेंच्या सोहळ्याला उपस्थिती होती. यामध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा समावेश होता.

पुण्याचे खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार नितेश राणे, आमदार गोपीचंद पडळकर, भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि इतर नेते सातपुतेंच्या विवाह सोहळ्याला उपस्थित होते. या नेतेमंडळींसह लग्नाला हजर असलेल्या इतरांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे पाहायला मिळाले. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्कदेखील दिसत नसल्यामुळे आता या प्रकरणी कोणती कारवाई केली जाणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

या लग्नाचे फोटो उपस्थितांनी सोशल मीडियावर शेअर केले. राम सातपुतेंवर यावेळी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. पण लग्नातील गर्दी पाहून अनेकांनी नाराजीही व्यक्त केली. सर्वसामान्यांसाठी लग्नाला केवळ ५० पाहुण्यांना बोलावण्याची मुभा असताना लोकप्रतिनिधींनी लग्नाला शेकडोच्या संख्येने गर्दी झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना नियम नेते मंडळी सर्रास धाब्यावर बसवतात. मग नियम केवळ सर्वसामान्यांसाठीत आहेत का, असा सवालदेखील या सोहळ्यानंतर विचारला जात आहे.