9 महिन्याच्या ब्रेकनंतर नट्टू काकांचे तारक मेहता…मध्ये कमबॅक


तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत पुन्हा एकदा लवकरच सेठजी मेरी पगार कब बढाओगें हा डायलॉग ऐकायला मिळणार आहे. लवकरच मालिकेत नट्टू काका अर्थातच घनश्याम नायक यांचे कमबॅक होणार आहे. ते एक-दोन दिवसांतच मालिकेत पुन्हा दिसणार आहेत. मी शूटिंगला पुन्हा सुरुवात करण्यासाठी फारच एक्सायटेड असल्याचे, घनश्याम यांनी सांगितले. तसेच त्यांची योग्य ती काळजी तारक मेहताच्या सेटवर घेतली जात असल्याचीही माहिती त्यांनी दिली. बाघा आणि जेठालाल यांच्यासोबत त्यांनी सुरुवातीचा सीन शूट केला.

घनश्याम नायक गेल्या 9 महिन्यांपासून या मालिकेपासून लांब होते. त्यांनी 16 डिसेंबरपासून तारक मेहताच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. नुकतीच एक मोठी शस्त्रक्रिया घनश्याम नायक यांच्यावर करण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून आता त्यांची तब्येत ठणठणीत असल्याची माहिती मिळत आहे. त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बातचित करताना सांगितले, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला काम करत राहायचे आहे. तारक मेहताच्या सेटवर, मेकअप केलेला असताना मला शेवटचा श्वास घ्यायचा असल्याची माझी शेवटची इच्छा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आधी वेगळ्याच भूमिकेसाठी सीरिअलमध्ये घनश्याम नायक यांना घेण्यात आले होते. पण गडा इलेक्ट्रॉनिक्समध्ये काम करणाऱ्या आणि वयाने मोठ्या असणाऱ्या कलाकाराचा जेव्हा शोध सुरू झाला तेव्हा, निर्मात्यांना घनश्याम नायक यांचे नाव दिलीप जोशी यांनी सुचवले. दिलीप जोशी यांनी असेही सांगितले की, नट्टू काकांची भूमिका घनश्याम चांगली साकारू शकतील. हा पर्याय मालिकेचे निर्माते असित मोदी यांनाही आवडला. आणि नट्टू काकांच्या भूमिकेसाठी घनश्याम नायक यांचे नाव निश्चित झाले.

1960 सालीच घनश्याम नायक यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात झाली होती. त्यांनी मासूम या चित्रपटामध्ये बालकलाकाराची भूमिका साकारली होती. घनश्याम नायक यांनी तेरे नाम, घातक, चायना गेट, बरसात, आंदोलन, खाकी, शिकारी, क्रांतिवीर, तिरंगा, हम दिल दे चुके सनम अशा अनेक चित्रपटांमध्ये झळकले आहेत. हिंदीसोबतच गुजराती इंडस्ट्रीमध्ये घनश्याम नायक यांनी नाव कमवले आहे.