क्रॉसवर्ड म्हणजे शब्दकोडे झाले १०७ वर्षाचे

लिहितावाचता येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी शब्दकोडे नक्कीच सोडविलेले असणार. आजकाल लहान मुलांच्या मनोरंजक पुस्तकातून अशी कोडी खूप येतात पण अनेकांचा शब्दकोडे सोडविणे हा आवडीचा टाईमपास सुद्धा आहे. मेंदूला व्यायाम देणारा हा मनोरंजक खेळ. आज या शब्दकोड्याचा १०७ वा वाढदिवस आहे. म्हणजे सज्ञान लोकांसाठी पाहिले शब्दकोडे वर्तमानपत्रात प्रसिध्द झाले तो दिवस होता २१ डिसेंबर १९१३ आणि अमेरिकेच्या न्युयॉर्क वर्ल्डने रविवारच्या अंकात ते प्रसिध्द केले होते.

हे पाहिले शब्दकोडे डायमंड शेपमध्ये होते आणि त्यात काळे चौकोन नव्हते. हे शब्दकोडे ब्रिटीश पत्रकार आर्थर वेन यांनी तयार केले होते. मजा म्हणजे हे कोडे त्यांनी वर्ल्ड क्रॉस अश्या नावाने तयार केले होते पण प्रिंटिंग मिस्टेक मुळे ते क्रॉसवर्ड असे छापले गेले आणि आजही त्याचे तेच नाव कायम आहे. १९२३ पासून अमेरिकेच्या बहुतेक सर्व वर्तमानपत्रातून शब्दकोडी छापली जाऊ लागली होती.

१९२२-२३ च्या सुमारास ब्रिटन मध्ये सुद्धा वर्तमानपत्रातून शब्दकोडी येऊ लागली. अमेरिकेतील कोड्यापेक्षा ही कोडी अधिक अवघड मानली जात असत. दुसऱ्या महायुध्द काळात पॅरीस मध्ये शब्दकोड्यांवर बंदी घातली गेली होती. शब्दकोड्याच्या माध्यमातून गुप्त संदेशांची देवाणघेवाण केली जाईल अश्या संशयाने ही बंदी घातली गेली होती. गिनीज बुक मध्ये नोंद झालेल्या सर्वात मोठ्या शब्दकोड्याचा आकार ७ फुट बाय ७ फुट असा आहे. त्यात ९१ हजार चौकटी आणि २८ हजार क्ल्यू दिले गेले होते.